चीन बनवत आहे ३०० नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे !

(‘सायलो’ क्षेपणास्त्र म्हणजे अशी भूमीगत व्यवस्था, ज्या माध्यमातून अणवस्त्रे डागली जाऊ शकतात.)

चीन३०० नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे

स्टॉकहोम (स्वीडन) – रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढत असून त्याचा परिणाम जगभरातील अण्वस्त्रांच्या साठ्यावर दिसून येईल. जगातील तिसरी मोठी सैन्यशक्ती असलेला चीनही त्याची शक्ती वाढवत असून तो ३०० हून अधिक नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे बनवत आहे. जानेवारी २०२२ मध्ये चीनकडे ३५० अण्वस्त्रे होती. अनेक तज्ञांच्या मतानुसार चीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रांची निर्मितीत रशिया आणि अमेरिका यांनाही मागे टाकेल, असा दावा ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’, म्हणजेच ‘सिप्री’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

(सौजन्य : CNN)

‘सिप्री’च्या अहवालानुसार जानेवारी २०२२ मध्ये भारताचा अण्वस्त्रांचा साठा एका वर्षात १५६ वरून १६० पर्यंत वाढला. भारत अजूनही अण्वस्त्रांचा साठा वाढवण्यासाठी काम करत आहे. जानेवारी २०२२ मध्ये पाकिस्तानकडे १६५ अणवस्त्रांचा साठा होता.

अहवालात पुढे म्हणण्यात आले आहे की,

अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया या ९ देशांकडे अण्वस्त्रे आहेत. रशिया आणि अमेरिका यांच्याकडे जगातील ९० टक्के अण्वस्त्रे आहेत. रशिया हा जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे असलेला देश असून त्याच्याकडे जानेवारी २०२२ मध्ये ५ सहस्र ९७७ अणवस्त्रे होती. त्याच्याकडे अशी अनुमाने १ सहस्र ६०० अणवस्त्रे आहेत, जी तो लगेच वापरू शकतो. अमेरिकेकडे ५ सहस्र ४२८ अण्वस्त्रे आहेत.

संपादकीय भूमिका

विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !