तिन्ही सैन्यदलांत ४ वर्षांसाठी तरुणांची भरती करणार

संरक्षण मंत्रालयाकडून ‘अग्निपथ भरती योजने’स प्रारंभ

नवी देहली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी ‘अग्निपथ भरती योजने’ची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यदलांत ४ वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. ४ वर्षांनंतर या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सैन्यदलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, या सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा सशक्त होईल. देशातील प्रत्येक तरुणाचे आयुष्यात सैन्य भरतीचे स्वप्न असते. या अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून तरुणांना इतर क्षेत्रात जाण्यासाठीही चांगली संधी मिळणार आहे.

प्राणांचे बलीदान करणार्‍या अग्निवीराच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचे साहाय्य !

लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, जर अग्निवीराने सेवेच्या काळात प्राणांचे बलीदान दिले, तर त्याच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचे साहाय्य केले जाणार आहे. अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. ४ वर्षांच्या सेवेमध्ये ६ मासांचा प्रशिक्षण कालावधीही समाविष्ट आहे. या सैनिकांना प्रतिमहा ३० सहस्र ते ४० सहस्र रुपये वेतनासह ४८ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.