‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प.पू. दास महाराज यांचा संदेश !
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त उपस्थित असलेल्या सर्व धर्मप्रेमींना सविनय प्रणाम !
१. कोरोना महामारी हा आपत्काळाचा केवळ आरंभ !
कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे प्रत्यक्ष अधिवेशन होऊ शकले नाही. या घटनेतून संतांनी सांगितलेल्या आपत्काळाची घंटा वाजल्याची अनुभूती संपूर्ण विश्व घेत आहे. या महामारीने अनेकांचे प्राण घेतलेच आहेत; पण हा केवळ आरंभ आहे. याच २ वर्षांत जगभरातील विविध देशांमध्ये राजकीय अराजकता, आर्थिक संकटे, युद्धजन्य स्थिती, तसेच नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्या आहेत. म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान येथे राजकीय अराजकता निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात तणाव आहे, तर युक्रेन-रशियामुळे जग अत्यंत भीषण अशा तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या सर्व घटनांमुळे इंधनासह अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
२. कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्र येणारच !
प.पू. गगनगिरी महाराजांपासून अनेक साधूसंतांनी या काळाची जाणीव करून दिली आहे. याच काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी श्रीरामरूपी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी पूर्वीच उपाय सांगितले आहेत. ज्याप्रमाणे निसर्गचक्र ज्ञात असल्याने ‘पावसाळा येणारच’, यावर आपण ठाम असतो, त्याप्रमाणे सध्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आपत्ती पहाता ‘वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र कसे येणार ?’, असा प्रश्न साधूसंतांना पडत नाही; कारण ते काळाच्या पलीकडे गेलेले असतात.
३. हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक स्तरांवर होत असलेले पालट !
अ. पूर्वी हिंदु असणे म्हणजे अपराध वाटायचा. ‘हिंदु’ हा शब्द उच्चारायलाही भीती वाटायची; पण आता ‘मी हिंदु आहे’, असे अभिमानाने सांगता येते. संघटितपणे केलेल्या कार्याची ही पहिली फलनिष्पत्ती आहे.
आ. दुसरा परिणाम म्हणजे हिंदुद्वेष्ट्यांच्या मनात धाक निर्माण झाला आहे.
इ. तिसरा परिणाम राजकीय पटलावर झाला आहे. तेथेही हिंदुहिताचे निर्णय घेतले जात आहेत. ही अधिवेशनाची मोठी फलनिष्पत्तीच आहे. हिंदु संघटना एकाच विचाराने कार्य करू लागल्या, तर त्यातून काय घडू शकते ? याची ही झलक आहे.
ई. हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे चौथ्या म्हणजे आध्यात्मिक स्तरावरही मोठा पालट झाला आह. अधिवेशनातून होत असलेल्या जागृतीमुळे देवताही प्रसन्न होऊ लागल्या आहेत. याची प्रचीती म्हणजे, अन्य धर्मियांनी उभारलेल्या विविध ठिकाणच्या अवैध वास्तूंमधून हिंदूंची मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती यांचे अवशेष सापडत आहेत.
४. आध्यात्मिक संप्रदायांचाही अधिवेशनात सहभाग वाढणे आवश्यक !
अधिवेशनात ज्या संघटना अजूनही पोचलेल्या नाहीत, त्यांच्यात जागृती करणे आवश्यक आहे. विशेषतः आध्यात्मिक संप्रदायांचा अधिवेशनात सहभाग अल्प असतो. तोही वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
५. कार्यकर्त्यांना भौतिक सुखाच्या मागे न लावता साधना करायला शिकवा !
सर्वच हिंदुत्त्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंचे संघटन करतांना कार्यकर्त्यांना भौतिक सुखाची ओढ लावू नये. त्यांना साधना शिकवावी. ‘ईश्वरच शाश्वत आनंद देऊ शकतो’, हे त्यांच्या मनावर बिंबवावे. त्यासाठी संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी धर्मशिक्षणवर्ग आणि नियमित सत्संग यांची सोय करावी. इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांच्या अनुयायांकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. एखाद्या शहरात शुक्रवारचा आठवडा बाजार असला, तरी मुसलमान दुकान तसेच उघडे ठेवून नमाज अदा करतात; कारण त्यांच्या मनावर मदरसा आणि चर्च येथे त्यांच्या पंथाचे महत्त्व बिंबवलेले असते. हेच सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे.
६. प्रार्थना !
‘आपण सर्वजण करत असलेल्या या कार्याला यश प्राप्त होवो आणि हिंदु राष्ट्राची पहाट लवकरात लवकर येवो’, हीच सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी प्रार्थना !
– परात्पर गुरुदेवांचा दास,
प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.