‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’च्या वतीने पिंपळपौर्णिमा साजरी !

वाळूंज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली

संभाजीनगर – येथील वाळूंज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली. १४ जून या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाणार असतांनाच वाळूंजमध्ये पत्नीपीडित पुरुषांनी ‘७ जन्म काय ७ सेकंदही ही पत्नी नको’, असे म्हणत पिंपळाला १०८ उलट्या फेर्‍या मारल्या. वर्ष २०१२ मध्ये स्थापन झालेल्या ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला.

अनेक वर्षांपासून जे पुरुष पत्नीपासून पीडित आहेत. आपल्याला कुणीही साहाय्य करत नाही. त्यामुळेच अशा पद्धतीच्या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून हे पुरुष आपले म्हणणे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरुषांच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना अशी ओळख या संस्थेच्या वतीने सांगितली जाते.

संपादकीय भूमिका

  • धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम !
  • जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर पती-पत्नींमधील देवाण घेवाण हिशोबामुळे एकमेकांपासून त्रास होतो, याचे ज्ञान झाले असते आणि त्यानुसार साधना चालू केली असती. साधनेमुळे प्रारब्ध अल्प होऊन जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाणे सुसह्य होते. आतातरी सरकार हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल का ?
  • पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय !