आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण
नवी देहली – ‘नॅशनल हेराल्ड’ नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात आली. या वेळी ‘ईडी’च्या कार्यालयात राहुल त्यांच्या समवेत त्यांची बहीण प्रियांका वाड्रा याही गेल्या होत्या. प्रथम जवळपास ३ घंटे चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांना जाऊ देण्यात आले. त्यानंतर ते रुग्णालयात भरती असलेल्या सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले. तेथून ते चौकशीच्या दुसर्या फेरीसाठी पुन्हा ‘ईडी’च्या कार्यालयात गेले. ही चौकशी उशिरापर्यंत चालू होती. या चौकशीत त्यांना नेमके काय विचारण्यात आले, ते समजू शकले नाही.
चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देशभर निदर्शने
राहुल गांधी ‘ईडी’च्या कार्यालयात पोचण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यानंतर देहली पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. देशभरातही ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. (यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कायद्यावर विश्वास नाही, असेच म्हणावे लागेल !- संपादक) या गैरव्यवहाराच्या प्रकरणी सोनिया गांधी यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. गांधी या सध्या कोरोनाबाधित असल्याने त्यांनी चौकशीला येण्यासाठी नंतरची वेळ मागितली आहे.