शिवभक्तांच्या उपस्थितीत सिंहगडावर तिथीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा !

पुणे – विश्व हिंदु परिषद, पुणे आणि ‘श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती’ (सिंहगड) यांच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेकदिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांच्या गजरामध्ये सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा १३ जून या दिवशी उत्साहात साजरा झाला. फुलांनी सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने स्वागत केले.

छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी फेरीमध्ये २ सहस्र शिवप्रेमी भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते. सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संयुक्तमंत्री दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष पांडुरंग राऊत आदी उपस्थित होते. सुरेश मोहिते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले, तसेच सिंहगडावरील मंदिरे अन् ऐतिहासिक ठिकाणांचे पूजनही या वेळी झाले.