हिंदूंचे विविध माध्यमांतून होणारे दमन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारत हा हिंदूबहुल देश आहे. जगभरातील हिंदूंचा आश्रयदाता होण्याचे सामर्थ्य असलेला आपला देश ! मात्र आज हिंदूबहुल भारतात हिंदूंचेच दमन होत आहे. वर्ष २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर हिंदूंवरील अत्याचारांवर अंकुश बसला असला, तरी हिंदूंचे दमन होण्याच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. हिंदुद्वेष्टे धर्मांध, साम्यवादी, पुरो(अधो)गामी टोळीच्या धर्म आणि राष्ट्र विरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत. जगातील अन्य कोणत्याही देशात बहुसंख्यांकांच्या अधिकारांना लाथाडले जात नाही; मात्र भारताच्या ‘सेक्युलर’ (निधर्मी) राज्यप्रणालीमुळे हिंदूबहुल भारतात हिंदूंची उपेक्षा होत आहे. ती होऊ नये, यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे.

श्री. रमेश शिंदे

संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकींवर आक्रमणे

काही कालावधीपूर्वी गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती या सणांच्या निमित्ताने निघालेल्या हिंदूंच्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमणे केली. उत्तराखंड, झारखंड, देहली, बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच आंधप्रदेश या राज्यात हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर दगडफेक करण्यात आली. पेट्रोल बाँब फेकण्यात आले. या मिरवणुकांवर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांनी इमारतींच्या गच्च्यांमध्ये दगडे, लाठ्या, सळ्या आदींचा साठा सिद्ध करून ठेवल्याची वृत्तेही प्रसारित झाली होती. विशेष म्हणजे जेव्हा जहांगीरपुरातील घटनेनंतर तेथील स्थानिक प्रशासनाने धर्मांधबहुल वस्तीतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवायला आरंभ केला, तेव्हा साम्यवादी, काँग्रेसी आणि धर्मांध टोळीने सर्वाेच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावून त्यावर स्थगिती आणली.

हिंदूंवर होणाऱ्या जीवघेण्या आक्रमणांनंतर उत्तरप्रदेशातील कैराना, तसेच हरियाणातील मेवात या गावांप्रमाणे राजस्थानातील करौली भागातील हिंदू गाव सोडून पलायन करत असल्याचे समोर आले आहे. वर्ष १९९० मध्ये जी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण झाली होती, ती स्थिती वर्ष २०२२ मध्ये देशातील अन्य प्रांतांमध्ये निर्माण होत असेल, तर ते हिंदूंच्या अस्तित्वाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आज देशातील ७७५ पैकी १०२ जिल्ह्यांत हिंदु अल्पसंख्य आहेत. हिंदूंचे अस्तित्व घटणे, ही राष्ट्राच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे; कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. ‘सेक्युलर’ (निधर्मी) लोकशाहीत बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंवर धार्मिक कारणांमुळे अत्याचार होत असतील, तर ते ‘सेक्युलर’पणाचे आणि लोकशाहीचे ठळक अपयश आहे, हे आपण मान्य करायला हवे.

– श्री. रमेश शिंदे

हिंदूंवर धर्मांतरामुळे होणारे विविध आघात

आजही देशात सर्रासपणे हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. ‘जीझस महान, हिंदु सैतान’, अशी शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असो, विभूती आणि रुद्राक्ष घालणाऱ्या विद्यार्थ्याला ख्रिस्ती शिक्षकाकडून मारहाण होण्याचा प्रकार असो, ‘लावण्या’सारख्या विद्यार्थिनींवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचा प्रकार असो वा आमीष दाखवून हिंदूंना बाटवण्याचा प्रकार असो ! हिंदूंवर होणारी जीवघेणी आक्रमणे, त्यांचे होणारे धर्मांतर यांमुळे हिंदूंची संख्या घटत चालली आहे, तर अन्य पंथियांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हिंदूंना सुरक्षितता प्रदान करण्यास सध्याची व्यवस्था कमकुवत ठरली आहे, हेच यातून दिसून येते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्यासम ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक !

आज जशी स्थिती आहे, तशीच स्थिती ४०० वर्षांपूर्वी होती. आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बरीदशाही आणि कुतूबशाही या ५ इस्लामी पातशाह्या हिंदूंवर वरवंटा फिरवत होत्या. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या इस्लामी राजसत्तांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदूंना सुरक्षितता प्रदान केली. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण केले. आजही हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हेच देशासमोरील सर्व समस्यांचे उत्तर आहे. हिंदु राष्ट्र ही कुठलीही राजकीय संकल्पना नाही, तर आध्यात्मिक संकल्पना आहे.

हिंदु राष्ट्राची संकल्पना जनमानसामध्ये रुजवण्यात गोवा येथे प्रतिवर्षी होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा महत्त्वाचा वाटा आहे. यंदा या अधिवेशनामध्ये देशभरातील २५० हून अधिक संघटनांच्या १००० हून अधिक प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला गती येण्याच्या दृष्टीने समान कृती कार्यक्रम निश्चित करणे, कार्य करतांना येणाऱ्या अनुभवांचे आदान-प्रदान करणे, कार्यातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना काढणे, हिंदु राष्ट्राच्या वैचारिक भूमिकेचा प्रसार करणे आदी अनेक पैलूंवर या अधिवेशनामध्ये प्रकाश टाकला जातो. ‘स्वतःचे योगदान देण्याची प्रेरणा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !

भोंगे आणि हनुमान चालिसा

सध्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा विषयही चर्चेत आहे. देशात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांमधून भल्या पहाटे कर्णकर्कश आवाजात अजान दिली जाते. या आवाजामुळे नागरिकांची झोप मोडून त्यांच्या शांत झोपेच्या अधिकारावर बंधने येतात. न्यायालयानेही रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ‘लाऊडस्पीकर’ (ध्वनीक्षेपक) लावण्यास बंदी घातली आहे. तरीही भोंग्यांवरून दिल्या जाणाऱ्या अजानमध्ये काडीमात्र फरक पडला नव्हता. न्यायालयाने हे अनधिकृत भोंगे काढून टाकण्याचे आदेश देऊनही पोलीस-प्रशासन त्यावर कार्यवाही करण्याचे सोयीस्कररित्या टाळत होते.

आता मनसे आणि अन्य राजकीय पक्षांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर याविषयी काही ठिकाणी भोंग्यांचे आवाज न्यून होत आहेत. आवाज न्यून होणे नव्हे, तर अनधिकृतपणे चालू असलेले भोंगेच उतरवले पाहिजेत. मुळातच ‘लाऊडस्पीकर’वरून दिली जाणारी अजान हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही’, असे इस्लामी विचारवंतांनी सांगूनही धर्मांध टोळ्या भारताचे कायदे मानण्यास सिद्ध नाहीत. धर्मांधांच्या हेकेखोरपणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर बंधने येत असूनही जेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा ते कायद्याचे राज्य आहे, असे म्हणता येईल का ? आज भोंग्यांना विरोध म्हणून ‘लाऊडस्पीकर’वरून हनुमान चालिसा पठण करण्याची प्रतिक्रियात्मक भूमिका राजकीय पक्ष घेत आहेत. तेव्हा हनुमान चालिसाला विरोध केला जातो, याला ‘समान न्याय’ म्हणता येईल का ? हिंदूंवर होणारा अशा प्रकारचा अन्याय दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.

– श्री. रमेश शिंदे