छत्रपती शिवरायांप्रमाणे गोव्यात विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशनात धोरण ठरणार ! – हिंदु जनजागृती समिती

रामनाथ मंदिर, फोंडा, गोवा येथे १२ ते १८ जून या कालावधीत अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन

फोंडा (गोवा), ११ जून (वार्ता.) – सध्या काशी येथील ‘ज्ञानवापी’ची चर्चा चालू असली, तरी हे एकच सूत्र नसून राष्ट्रीय स्तरावर अशी अनेक मंदिरे आहेत. गोव्यात पोर्तुगीज, बहामनी आणि आदिलशाह या आक्रमकांच्या राजवटीत हिंदूंच्या अनेक भव्य मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. त्यांतील श्री सप्तकोटेश्‍वराच्या मंदिराचे पुनर्निर्माण स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. तशीच कृती गोव्यातील विध्वंस करण्यात आलेल्या मंदिरांविषयी होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांचा हाच आदर्श समोर ठेवून १२ ते १८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा येथे होणार्‍या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त गोव्यासह देशभरातील अशा विध्वंस करण्यात आलेल्या मंदिरांविषयी चर्चा होणार आहे.

डावीकडून श्री. सत्यविजय नाईक, माहिती देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि अधिवक्ता शैलेंद्र नाईक

यात पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याविषयी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना धोरण ठरवणार आहेत, असे प्रतिपादन ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते फोंडा, गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला ‘फोंडा बार कौन्सिल’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता शैलेंद्र नाईक आणि समितीचे गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक हे उपस्थित होते.

श्री. सत्यविजय नाईक म्हणाले,

‘‘पोर्तुगिजांनी पाडलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा स्तुत्य निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. या विषयाला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता आहे. मंदिरांविषयी विचार मंथन करण्यासाठी विविध मंदिरांचे विश्‍वस्त, भक्त, तज्ञ, अधिवक्ता तथा हिंदुत्वनिष्ठ एकत्र येणार आहेत. १३ जून या दिवशी ‘मंदिरांची सुरक्षा’ आणि ‘मंदिर सुव्यवस्थापन’ हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे, तसेच या विषयावर होणार्‍या ‘हिंदु राष्ट्र संसदे’त सर्वांना सहभागी होता येणार आहे. या चर्चेनंतर मंदिरांच्या पुनर्निर्माणाविषयी सर्वानुमते ठराव करण्यात येतील.’’

या अधिवेशनाला गोव्यातील सर्वश्री प्रा. सुभाष वेलिंगकर, प्रशांत वाळके, हनुमंत परब, कमलेश बांदेकर, अंकित साळगांवकर, नितिन फळदेसाई आणि भाई पंडित आदी हिंदुत्वनिष्ठ तथा विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.