खरा इतिहास लिहिण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

डावीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – गेल्या एक सहस्र वर्षांपासून परकीय आक्रमणांच्या विरोधात अनेक हिंदु राजांनी, तसेच वीर योद्ध्यांनी लढाई लढली; मात्र त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे विस्मरण झाले आहे. काहींनी इतिहासाचे विकृतीकरण केले; पण आता सत्य इतिहास लिहिण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे ‘महाराणा: सहस्र वर्षो का धर्मयुद्ध’ या हिंदी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलतांना केले. डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

अमित शहा पुढे म्हणाले की,

१. कित्येक साम्राज्ये होऊन गेली; पण (डाव्या विचारांच्या) इतिहासकारांनी केवळ मोगल साम्राज्याची चर्चा केली. पाण्डय साम्राज्य ८०० वर्षे, ओहम साम्राज्य ६५० वर्षे, पल्लव आणि चालुक्य यांचे साम्राज्य ६०० वर्षे, मौर्याचे साम्राज्य ५५० वर्षे टिकले. सातवाहन साम्राज्याने ५०० वर्षे, तर गुप्त सम्राज्याने ४०० वर्षे राज्य केले. समुद्रगुप्ताने सर्वप्रथम देश म्हणून भारताची संकल्पना मांडली; पण या गौरवशाली इतिहासावर संदर्भग्रंथ लिहिले गेले नाहीत. ही प्रक्रिया चालू झाली, तर इतिहासाचे विकृतीकरण थांबेल आणि लोकांसमोर सत्य मांडले जाईल.

२. काहींनी इतिहास असा लिहिला की, त्यातून नैराश्य यावे. भारताच्या भूमीत निराशा टिकू शकत नाही. असत्य १०० वर्षे टिकून राहिले असेल; पण अंततः सत्याचा विजय होतो. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले; म्हणून टीका करण्यापेक्षा सत्याच्या आधारावरील इतिहास लिहिण्यासाठी अधिक कष्ट घेतले पाहिजेत, तरच असत्यावर सत्याने मात केली, असे होईल. असत्यावर टिप्पणी केल्यामुळे असत्याचाच प्रचार होत असतो.

३. राणी पद्मिनीचा त्याग आजही येथील महिला आणि पुरुष यांना अभिमानाने जगण्याची प्रेरणा देतो. राजांनी लढाया हारल्या असतील; पण त्यांचा संघर्ष लोकांमध्ये जागृती निर्माण करून गेला. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्याला पराभूत व्हावे लागले होते; पण या संग्रामानेच ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला होता. जय-पराजयातून इतिहास ठरत नाही, तर त्या घटना किती परिणामकारक होत्या, त्यावर इतिहास लिहिला जातो.

४. कोणतेही सरकार इतिहास निर्माण करू शकत नाही. समाजानेच पुढाकार घेऊन इतिहासाचे लिखाण केले पाहिजे. सरकारच्या अभ्यासक्रमातून केवळ ओळख होते; पण इतिहास समजून घ्यायचा असेल, तर त्याचे सखोल वाचनही करावे लागते. त्यासाठी इतिहास आपल्या दृष्टीकोनातून लिहिण्याचा प्रयत्न केला, त्यावर चर्चा केली आणि त्याचा नव्या पिढीने अभ्यास केला, तर असत्यावर विजय मिळवण्याची लढाई दीर्घकालीन असली, तरी जिंकता येईल.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने आता शालेय आणि महाविद्यालय अभ्यासक्रमांतील खोटा इतिहास काढून लवकरात लवकर खरा इतिहास अंतभूर्त करावा !