‘एन्.आय.एफ.’ आणि ‘ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून गायीच्या शेणापासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यास प्रोत्साहन !

पुणे – टाकाऊपासून टिकाऊ वस्तू सिद्ध करण्याचे सध्या अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर भर दिला गेला पाहिजे. एक चांगली कल्पना पूर्ण गावाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे आता नागरिक नवीन कल्पनांचा गांभीर्याने विचार करत आहेत, असे मत नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे (‘एन्.आय.एफ.’चे) संचालक आणि मुख्य नवकल्पना अधिकारी डॉ. विपीन कुमार यांनी व्यक्त केले. ते ‘इको फ्रेंडली गणपति’ मूर्तीविषयी जनजागृती करण्यासाठी ‘एन्.आय.एफ.’ आणि ‘ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ‘ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या इको फ्रेंडली श्री गणेशमूर्तीविषयी माहिती देण्यात आली, तसेच अशा इको फ्रेंडली गणेशमूर्ती का आवश्यक आहेत ? याविषयी या वेळी ‘पीपीटी’ सादरीकरण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • धर्मशिक्षणाच्या अभावामुळे गायीच्या शेणापासून श्री गणेशमूर्ती करण्याचे प्रबोधन करणारे अज्ञानी !
  • गोमयापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती ही अशास्त्रीय आहे. गोमयामध्ये मुळातच गोमातेचे तत्त्व असते. शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे निसर्गत:च गोमातेचे तत्त्व असलेल्या गोमयात श्री गणेशतत्त्व आकर्षिले जाऊ शकत नाही. ‘चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून श्री गणेशमूर्ती बनवावी’, असा शास्त्रविधी आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पृथ्वीवर येणाऱ्या श्री गणेशतत्त्वाच्या लहरी शाडू मातीच्या मूर्तीमध्ये ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे गणेशभक्तांनो, अशा गोंडस प्रचाराला बळी न पडता शास्त्रसुसंगत कृती करा आणि श्री गणेशाची कृपा संपादन करा !