एका १६ वर्षीय मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार !

चालक, वाहक यांसहित ३ जणांनी केले कृत्य !

बेतिया (बिहार) – येथे एका १६ वर्षीय मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. चालक, वाहक यांच्यासह तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची प्रकृती सध्या गंभीर आहे. तिच्यावर पोलीस सुरक्षेत उपचार चालू आहेत. घटना बेतिया बसस्थानकापासून १०० मीटर अंतरावर घडली आहे.

१. पीडित मुलगी ७ जूनच्या दुपारी मोतिहारीहून बेतिया येथे परतत होती. यावेळी वाहकाने तिला गुंगीचे औषध दिले. पीडितेने सांगितले की, सायंकाळी उशिरा बेतिया बस स्थानकावर आल्यानंतर सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. चालक गाडी घेऊन स्थानकापासून अनुमाने १०० मीटर अंतरावर गेला आणि एका निर्जन ठिकाणी त्याने बस थांबवली.

२. यानंतर चालक, वाहक यांच्यासह ३ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. ती बेशुद्ध पडल्यावर तिघे बस सोडून पळून गेले. पोलिसांची ‘पॅट्रोलिंग गाडी’ रस्त्यावरून जात होती. संशयावरून पोलिसांनी बसची झडती घेतली असता मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आली.

३. पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने तिच्यासमवेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. दोन जणांना पोलिसांनी कह्यात घेतले असून तिसर्‍या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘शिक्षेनेच जग चालते !’ हे लक्षात घेऊन बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा केल्यासच अशा प्रकरणांवर कुठेतरी आळा बसेल, हे लक्षात घ्या !
  • समाज धर्माचरणी नसल्यानेच अशी कृत्ये घडतात. समाजपुरुषामध्ये नीतीमत्ता आणि सदाचरण निर्माण होण्यासाठी त्याच्याकडून साधनाच करवून घेणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात समाजाकडून साधना नियमितपणे करवून घेतली जाईल !