राज्यात १ लाख ७५ सहस्रांहून अधिक अभियंते नोकरीच्या शोधात !

बी.ए.नंतर रोजगार धुंडाळणारे १ लाख !

नाशिक – राज्यात वर्षाला दीड लाख नवे अभियंते सिद्ध होतात. महाराष्ट्र  शासनाच्या ‘महास्वयम् पोर्टल’वर १ लाख ७५ सहस्रांहून अधिक अभियंत्यांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. दळणवळण बंदीमुळे रसातळाला गेलेले उद्योगक्षेत्र पूर्ववत् होत असले, तरी अभियंत्यांसाठी नोकऱ्यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि बी.ए., बी.कॉम अन् बी.एस्सी. या पदवीधरांपेक्षा नोकरी न मिळालेल्या अभियंत्यांची संख्या अधिक आहे. उद्योगक्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि नोकरीच्या शोधात असलेले तरुण यांच्यात संवाद अन् समन्वय घडवून आणण्यासाठी शासनाच्या कौशल्य विकास आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने नोंदणी केली जाते. या नोंदणीनुसार राज्यातील २३ लाख ५२ सहस्र ४६९ तरुणांनी नोकरीच्या संधीसाठी नावे नोंदवली आहेत. त्यात अभियंता पदवी घेतलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १ लाख १२ सहस्र ३२४ आहे, तर ६४ सहस्र ८०२ डिप्लोमाधारक अभियंता नोकरीच्या शोधात आहेत.  शासनाच्या ‘महास्वयम् पोर्टल’वर राज्यातील २३ लाख ५२ सहस्र ४६९ तरुणांनी नोकरीच्या संधीसाठी नाव नोंदवले असून यामध्ये पुणे येथील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.