‘माझी वसुंधरा’ मोहिमेत सोलापूर शहराचा राज्यात चौथा क्रमांक !

मोहिमेच्या उपक्रमांत मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) दुसऱ्या क्रमांकावर

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा सन्मान करतांना अजित पवार आणि आदित्य ठाकरे

सोलापूर, ७ जून (वार्ता.) – ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत यंदा सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ५ जून या दिवशी जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘अमृत शहरे’मध्ये सोलापूर महापालिकेस राज्यात चौथा, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या वेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा सन्मान करण्यात आला, तर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पुणे विभागातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आले. मंद्रुप (तालुका दक्षिण सोलापूर)ला ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला. मंद्रुपच्या सरपंच कलावती खंदारे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, कृषी विस्तार अधिकारी सचिन चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षारोपण, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन, पक्षी धाम आदी संकल्पना गावात राबवण्यात आल्या. त्याची नोंद घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.