गर्भवतीचा छुपा शत्रू : गर्भारपणातील मधुमेह (भाग २)

१. भविष्यातील व्याधींपासून रक्षण होण्यासाठी वयात आलेल्या मुलींची आतापासूनच योग्य काळजी घेणे आवश्यक !

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

वयात येणाऱ्या मुलींची नीट काळजी घेतली, तर भविष्यात त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि वजन यांचे प्रमाण अल्प करता येईल. नियमित व्यायाम करणे आणि योग्य आहार आहे, याची सवय मुलींना लहानणापासूनच लावली, तर त्यांचे वजन नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होईल. मासिक पाळी चालू होऊन २-३ वर्षांत जर ती नियमित झाली नाही, तर स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा अन् पाळी नियमित येईल, याकडे लक्ष ठेवावे.

२. अधिक वजन असलेल्या स्त्रियांनी गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी तज्ञांचा समुपदेश घ्यावा !

गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी आपले वजन योग्य आहे ना, याविषयी समुपदेश घ्यावा, अन्यथा वजन अल्प करूनच पुढील नियोजन करावे. ‘आधी वजन अल्प करून मग गर्भधारणेचे नियोजन करा’, असे सांगितल्यावर पुष्कळ वेळा मुली अप्रसन्न होतात. पुढील समस्या टाळण्याचाच तो आमचा प्रयत्न असतो, हे लक्षात घ्यायला हवे. गर्भपात होण्याचे प्रमाणही अधिक वजनाच्या मुलींमध्ये लक्षणीय आहे.

३. गर्भवती महिलांनी कर्बोदके अल्प आणि प्रथिने अधिक हा नियम पाळावा !

गर्भवती महिला प्रत्येक वेळी पडताळण्यासाठी येतात, तेव्हा आमचे त्यांच्या वाढत्या वजनाकडे बारीक लक्ष असते. पुष्कळ वेगाने वाढणारे वजन हे धोक्याचे असते. कर्बोदके अल्प आणि प्रथिने अधिक हा नियम पाळायला हवा. शक्यतो गर्भवतीला अती खायला घालणे पूर्णपणे टाळावे.

४. मधुमेह असलेल्या गर्भवतींनी साखरेची पडताळणी करण्यासाठी ‘ग्लुकोमीटर’ घरात ठेवणे उत्तम !

एकदा मधुमेहाचे निदान झाले की, आम्ही औषधांच्या काही गोळ्या घेण्यास सांगतो. गर्भवतीने ‘बीएस्एल्’ (रक्तातील साखरेची पातळी) पडताळून आम्हाला नियमित कळवत रहाणे अत्यावश्यक आहे. गोळ्या, आहार आणि व्यायाम करूनही साखर नियंत्रणात न आल्यास इन्सुलिनची इंजेक्शने चालू करावी लागतात. यासाठी कधी कधी रुग्णाला भरती करून साखरेची वारंवार पडताळणी करून डोस ठरवावा लागू शकतो. इन्सुलिनचे इंजेक्शन कसे घ्यायचे, हे रुग्ण किंवा तिचे नातेवाईक यांना शिकवले जाते. इन्सुलिन चालू केल्यानंतर रुग्णावर बारीक लक्ष ठेवावे लागते. साखरेचे प्रमाण अल्प झाल्यास साखर नेहमीच जवळ ठेवणे महत्त्वाचे असते. या रुग्णाने ‘ग्लुकोमीटर’ घरात ठेवावा. त्यामुळे साखरेची पडताळणी नियमितपणे घरीच करता येते. प्रारंभी प्रयोगशाळेत रक्त देतांना त्याच नमुन्याची घरच्या ‘ग्लुकोमीटर’वरही पडताळणी करावी. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल आणि ‘ग्लुकोमीटर’वरचा अहवाल यांची तुलना करून ‘कॅलिब्रेशन’ (मोजमाप) करता येते. अशा प्रकारे बऱ्यापैकी साखरेची अचूक पडताळणी घरीच करता येते.

५. मधुमेह असलेल्या गर्भवतीच्या बाळाकडे लक्ष ठेवण्यासाठी अधिक वेळा ‘सोनोग्राफी’ करावी लागणे

मधुमेह असलेल्या गर्भवतीच्या बाळाकडेही विशेष लक्ष ठेवावे लागते. यासाठी ‘सोनोग्राफी’ अधिक वेळा करण्यात येते. त्यासमवेतच ‘डॉप्पलर स्टडी’ ही चाचणीही केली जाते. यामध्ये बाळाला आईकडून होणारा रक्तपुरवठा पडताळून बघितला जातो. मधुमेही स्त्रियांची बाळे बहुतेक वेळा वजनाने अधिक असतात; पण काही वेळा त्यांची वाढ खुंटते आणि त्यांचे वजन अन् वाढ अल्प होऊ लागते. हा चिंतेचा विषय असतो. अशा बाळांची प्रसुती वेळेपूर्वी करावी लागू शकते.

६. मधुमेहासवेमत गर्भवतीचा रक्तदाब वाढल्यास त्याकडेही गांभीर्याने पहावे लागणे

मधुमेहासमवेत कधी कधी गर्भवतीचा रक्तदाबही वाढू लागतो. त्यासाठी वेगळी औषधे चालू करून त्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. गर्भवतीचे दिवस जसजसे भरत येतात, तसतसे साखर आणि रक्तदाब (वाढला असल्यास) हळूहळू वाढू लागतो. अशा वेळी गर्भवतीच्या प्रकृतीकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागते. धोक्याची शक्यता वाढल्यास वेळेआधी प्रसुती करण्याचा निर्णयही घ्यावा लागू शकतो.

७. मधुमेह असलेल्या गर्भवतीची प्रसुती साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असणे

मधुमेह असलेल्या गर्भवतीची प्रसुती कधी करायची, हे तिची साखर नियंत्रणात आहे कि नाही, यावर ठरवण्यात येते. मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात असेल, तर दिवस भरेपर्यंत थांबता येते. तसे नसेल आणि ‘सोनोग्राफी’मध्ये बाळावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसले, तर वेळेपूर्वी प्रसुती करण्याचा निर्णय घेतला जातो. अशा वेळी बाळाचे फुफ्फुस अधिक चांगले कार्यरत व्हावे; म्हणून गर्भवतीला ‘स्टिरॉइड्स’ची इंजेक्शने दिली जातात. त्यानंतर प्रसुती केली जाते. बाळ आणि आई यांची प्रकृती नाजूक असल्याने ‘सिझेरियन’ची (शस्त्रकर्म करून प्रसुती करणे) शक्यता वाढते.

८. ‘सिझेरियन’साठी काही कारणीभूत घटक

बाळाचे वजन अधिक असणे, बाळाभोवतीचे पाणी अधिक असल्याने त्याचे डोके वर तरंगत रहाणे, मधुमेह आणि रक्तदाब यांमुळे बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह अल्प होणे अशा प्रकारची कारणे ‘सिझेरियन’साठी कारणीभूत असू शकतात. प्रसुती झाल्यानंतरही या बाळांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. तसे न केल्यास त्यांना रक्तातील साखर अल्प होणे आणि कावीळ यांसारख्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो.

९. गर्भारपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांनी प्रसुतीनंतरही आयुष्यभर काळजी घ्यावी !

गर्भारपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांनी प्रसुतीनंतरही आयुष्यभर काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसुतीनंतर मधुमेह तात्पुरता नाहीसा होतो; परंतु नंतर नियमित व्यायाम करणे आणि आहार यांचे पथ्य न पाळल्यास मधुमेह परत येऊन कायमचा पाठीशी लागू शकतो. हृदयरोग, किडनीचे आजार, तसेच काही प्रकारचे कर्करोग यांचीही शक्यता वाढते.

१०. कोणतीही गोष्ट २१ दिवस नियमित केली की तिची सवय लागते !

मधुमेह हा त्रासदायकच आजार आहे; पण आपण तो सहज टाळू शकतो किंवा त्याला आटोक्यात ठेवू शकतो. ओशो यांनी म्हटले होते, ‘‘कोणतीही गोष्ट तुम्ही २१ दिवस नियमितपणे केली की, तिची तुम्हाला सवय होऊन तुम्ही ती आयुष्यभर करू शकता.’’ सोपे आहे ना ? आजपासूनच पुढील २१ दिवस तुम्ही पांढरा भात, बटाटा, साखर, मैदा आहारातून अल्प करून प्रतिदिन एक घंटा व्यायाम केला, तर पुढचे जमलेच !

– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे.