स्वत:शीच लग्न करण्याची पद्धत हिंदु धर्माच्या विरोधात ! – भाजपचा दावा

  • काँग्रेसचीही टीका !

  • गुजरातमधील युवती करणार स्वतःचीच लग्न !

गुजरातमधील भाजपच्या नेत्या सुनीता शुक्ला (डावीकडे) गुजरातमधील युवती ‘क्षमा बिंदू (उजवीकडे)

वडोदरा (गुजरात) – स्वत:शीच लग्न करणे, ही पद्धत हिंदु धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजपने गुजरातमधील एका युवतीने स्वतःशीच लग्न करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. बडोदा येथील क्षमा बिंदू ही २४ वर्षीय तरुणी ११ जूनला श्री हरिहरेश्‍वर मंदिरात स्वत:शीच लग्न करणार आहे.

गुजरातमधील भाजपच्या नेत्या सुनीता शुक्ला म्हणाल्या, ‘‘क्षमा बिंदू हिची मानसिक स्थिती ठीक नाही. तिला कुठल्याही मंदिरात अशा पद्धतीने लग्न करण्याची  अनुमती दिली जाणार नाही. स्वत:शीच लग्न करण्याच्या या प्रकारामुळे हिंदूंची लोकसंख्या अल्प होईल. तिचा स्व-विवाहाचा हा निर्णय कॅनेडातील ‘एनी विथ ई’ या ‘वेब सिरिज्’ने प्रेरित आहे.’’ (यावरून हिंदूंवर पाश्‍चात्त्यांचा किती पगडा आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! हिंदु धर्मात अनन्यसाधारण स्थान असलेला विवाह संस्कार आणि ४ पुरुषार्थ यांचे महत्त्व ज्ञात नसल्यामुळेच हिंदूंकडून असे धर्मशास्त्रविरोधी प्रकार केले जातात. याने धर्महानी होत असल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही !
  • केवळ स्वस्तातील प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःला अतीशहाण्या समजणार्‍या लोकांकडून असे कृत्य केले जाते, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?
  • आता पुरो(अधो)गामी टोळी बिळातून बाहेर येऊन या युवतीच्या कथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने न बोलल्यासच नवल !

(म्हणे) ‘हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देणारे प्रतीक !’ – क्षमा बिंदू

स्वतःशीच लग्न करण्याविषयी क्षमा बिंदू म्हणाली, ‘अन्य मुलींप्रमाणे माझेही नवरी बनण्याचे स्वप्न आहे; परंतु मला पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे नाही. त्यामुळे मी नवरदेवाविना लग्न करण्याचा विचार केला आहे. हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देणारे प्रतीक असेल.’ भारतात असे लग्न प्रथमच होत आहे. अमेरिकेत वर्ष १९९३ मध्ये लिंडा बार्केन यांनी स्वतःशी लग्न केले होते.

संपादकीय भूमिका

मग आतापर्यंत ज्यांनी असे लग्न केले नाही, ते सर्व जण स्वतःचा द्वेष करतात का ? ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, असे हे विधान म्हणावे लागेल !

स्व-विवाह हा वेडेपणा ! – काँग्रेस

काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते मिलिंद देवरा यांनी स्व-विवाह हा वेडेपणा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आशा आहे की, हा वेडेपणा भारतापासून दूर राहील.