नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या आक्रमणात ५० हून अधिक ख्रिस्ती ठार

अबुजा (नायजेरिया) – येथे ५ जून या दिवशी ‘सेंट फ्रान्सिस’ नावाच्या कॅथॉलिक चर्चवर झालेल्या भीषण आक्रमणात ५० हून अधिक लोक ठार झाले. यामध्ये घायाळ झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. बंदूकधारी आक्रमणकर्त्यांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर शस्त्रांद्वारे आक्रमण केले आणि त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. यासह त्यांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, अशी माहिती ओंडो राज्याचे पोलीस प्रवक्ते फनमिलायो इबुकुन ओदुनलामी यांनी दिली.
‘पेन्टेकोस्ट’ सण साजरा करण्यासाठी ख्रिस्ती चर्चमध्ये जमले होते. हे आक्रमण कुणी आणि का केले ?, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. नायजेरिया ईशान्येकडील इस्लामी बंडखोरी आणि सशस्त्र टोळ्यांशी लढत आहे. खंडणीसाठी आक्रमणे आणि अपहरण करण्याच्या घटना येथे मोठ्या प्रमाणात घडतात.