५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. धनंजय मनोज शिंदे (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. धनंजय मनोज शिंदे हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

______________________________________

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. धनंजय शिंदे

१. बाळाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला झालेले त्रास

‘माझ्या वहिनी (माझ्या भावाची पत्नी) सौ. प्रियांका मनोज शिंदे दुसऱ्या बाळाच्या (चि. धनंजयच्या) वेळी गर्भवती असतांना त्यांना फारच त्रास होत होता. शेवटचे २ मास त्यांना खोकल्याचा पुष्कळ त्रास झाला. त्यांचा हा त्रास काही केल्या उणावत नव्हता. तेव्हा मी त्यांना दत्तगुरूंचा नामजप करायला सांगितला. त्यानंतरही त्यांना त्रास होतच होता.

२. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या आईला झालेले त्रास आणि त्यांवर केलेले उपाय

२ अ. आईने नवजात बालकाला न घेणे : वहिनींची प्रसुती शस्त्रकर्म करून झाली. बाळाच्या जन्मानंतरही वहिनींना पुष्कळ त्रास होत होता. ‘नवजात बालकाला त्याच्या आईकडे (वहिनींकडे) नेल्यावर तिने बाळाला जवळ घेतले नाही’, असे मला आईने सांगितले. त्या वेळी मी घरी होते आणि आई वहिनींसह रुग्णालयात होती.

२ आ. बाळाच्या आईला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात आल्यावर साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना करणे आणि विविध उपाय केल्यावर बाळाच्या आईने बाळाला जवळ घेतले असल्याचे तिला समजणे : आईने हे सांगितल्यावर माझ्या लक्षात आले, ‘वहिनींना आध्यात्मिक त्रास आहे.’ तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केली आणि ‘वहिनींवर आलेले त्रासदायक आवरण संत काढत आहेत’, असा भाव ठेवून मी स्वतःवरील आवरण काढू लागले. मी वहिनींचे नाव कागदावर लिहून त्याभोवती नामजपाचे मंडल काढले. मी त्या कागदाची सात्त्विक उदबत्तीने शुद्धी करून तो कागद देवाच्या छायाचित्रासमोर ठेवला आणि ‘वहिनींवरचे त्रासदायक आवरण नष्ट होऊ दे’, अशी देवाला तळमळीने प्रार्थना केली. नंतर १० – १५ मिनिटांनी मी आईला भ्रमणभाष करून ‘वहिनी कशा आहेत ?’, असे विचारले. तेव्हा आई म्हणाली, ‘‘आता बरी आहे आणि तिने बाळालाही जवळ घेतले आहे.’’ तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

२ इ. नंतर मी वहिनींना दत्तगुरूंचा नामजप करायला सांगितला. त्यांनी नामजप चालू केल्यानंतर त्यांचा त्रास उणावला.

३. जन्म ते ३ वर्षे

धनंजय शांत आहे. तो केवळ भूक लागल्यावरच रडायचा आणि दूध पिऊन पुन्हा शांत झोपायचा. तो अंघोळ करतांनाही शांत रहायचा.

कु. स्वाती शिंदे

४. वय ३ ते ४ वर्षे

४ अ. धनंजयचे हसणे फारच मोहक आहे. त्याच्याकडे बघून मनाला प्रसन्न वाटते.

४ आ. प्रेमभाव : तो अन्य मुलांना स्वतःची खेळणी देतो. त्याला कुणी खाऊ दिल्यास तो आधी सर्वांना खाऊ देतो आणि नंतरच स्वतः खातो. त्याचे त्याच्या मोठ्या भावाशी चांगले पटते.

४ इ. आदरातिथ्य करणे : घरी कुणी पाहुणे आल्यास तो त्यांना ‘या, बसा’, असे सांगून पाणी देतो आणि ‘चहा घेणार का ?’, असे विचारून चहा नेऊन देतो. पाहुण्यांचा चहा घेऊन झाल्यावर तो रिकामा कप स्वयंपाकघरात नेऊन ठेवतो.

४ ई. मोठ्यांचा आदर करणे : त्याचे वयस्करांशी अधिक जुळते. तो माझे बाबा (त्याचे आजोबा श्री. बाळकृष्ण शिंदे) आणि आमच्या शेजारचे काका यांच्याशी चांगल्या गप्पा मारतो. त्याला आजी-आजोबांना (श्री. बाळकृष्ण आणि सौ. मंगल बाळकृष्ण शिंदे यांना) आणि आई-बाबांना (सौ. प्रियांका आणि श्री. मनोज शिंदे यांना) नमस्कार करायला सांगितल्यावर तो लगेच त्यांना नमस्कार करतो. तो मोठ्यांचा आदर करतो. तो आजोबांना ‘बाबा, जेवायला या’, असे सांगून त्यांच्यासाठी चटई अंथरतो. त्यांना पाण्याचा तांब्या भरून देतो आणि जेवणाचे ताट आणून ठेवतो अन् ‘आता जेवा’, असे सांगतो.

४ उ. धार्मिक कृती करण्याची आवड असणे : संध्याकाळी देवघरातील दिवा शांत झाला असेल, तर तो आईला दिवा लावायला सांगतो. त्याला देवाला नमस्कार करायला आणि कपाळाला टिळा लावायला आवडते.

४ ऊ. ‘जय जय स्वामी समर्थ ।’, असा नामजप करणे : तो दूरचित्रवाहिनीवरील ‘श्री स्वामी समर्थ’ ही मालिका आवडीने बघतो आणि येता-जाता ‘जय जय स्वामी समर्थ ।’, असा नामजप करतो. रात्री सगळे झोपले असतांना तो जागा असल्यास एकटाच ‘जय जय स्वामी समर्थ ।’, असा जप करत असतो.

५. स्वभावदोष

हट्टीपणा

‘प.पू. श्रीगुरुमाऊली, आपणच धनंजयची ही सर्व गुणवैशिष्ट्ये लिहून घेतलीत’, याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’

– कु. स्वाती शिंदे (आत्या), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मे २०२१)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक