पालखी मार्ग आणि पालखी तळावरील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत !

आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची सूचना

सोलापूर – संतांचा पालखी सोहळा जिल्ह्यात येण्यापूर्वीच पालखी मार्ग, सर्व पालखी तळावरील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. (अशी सूचना का द्यावी लागते ? – संपादक) माळशिरस पंचायत समितीच्या डॉ. अब्दुल कलाम सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय उपायुक्त विकास विजय मुळीक, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, तसेच पालखी मार्गावरील सर्व ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. पालखी मार्गावर लागणारे अधिकचे मनुष्यबळ याचा कृती आराखडा ७ जूनपर्यंत सिद्ध करावा, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टँकर भरण्याची ठिकाणे, विजेची सोय करणे, आरोग्य दूतांची नेमणूक करणे यांविषयी चर्चा करण्यात आली. खासगी रुग्णालयातील काही खाटा यात्रा कालावधीत वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या, तसेच सर्व ठिकाणी कचरा व्यवस्थापन करण्याचे आवाहन दिलीप स्वामी यांनी केले.