रशियन तेलाच्या आयातीवरील निर्बंधांना युरोपीयन युनियनची औपचारिक मान्यता

ब्रुसेल्स (बेल्जियम) – युरोपीयन युनियनने रशियाकडून तेलावरील आयातीस निर्बंध घालण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. यासह रशियाच्या प्रमुख बँकांवरील निर्बंधांनाही मान्यता देण्यात आली आहे. रशियाच्या कच्च्या तेलाची आयात ६ मासांत टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल आणि ८ मासांत इतर पेट्रोलियम उत्पादनांवरही बंदी घातली जाईल, असे युरोपीयन युनियनच्या मुख्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. युरोपीयन महासंघ रशियाकडून अनुमाने २५ टक्के तेल आयात करतो. या निर्णयामुळे या वर्षाच्या शेवटी रशियाची युरोपमध्ये ९० टक्के तेल निर्यात रोखली जाईल.

युरोपीयन युनियनमधील हे देश निर्बंधांपासून दूर

  • हंगेरी, झेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया या युरोपीयन युनियनमधील देशांनी रशियावरील निर्बंधाचा युनियनचा निर्णय अमान्य केला आहे. हे देश पूर्णपणे रशियाच्या तेलपुरवठ्यावरच अवलंबून आहेत.
  • बल्गेरिया आणि क्रोएशिया यांना विशिष्ट प्रकारच्या तेलासाठी रशियाकडून आयातीस तात्पुरती सवलत मिळाली आहे.

रशियाच्या या प्रमुख बँकांवर निर्बंध

  • सबर बँक ऑफ रशिया
  • क्रेडिट बँक ऑफ मॉस्को
  • रशियन कृषी बँक
  • बेलारूसियन बँक फॉर डेव्हलपमेंट अँड रिकन्स्ट्रक्शन