सातारा, २ जून (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सोळशी येथे शनीजयंतीनिमित्त शनैश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा केला जातो. या वेळी २८ ते ३० मे या कालावधीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनजंय देसाई यांना ‘शनैश्वर धर्मरक्षा कृतज्ञता’, समाजसेवक मंगेश धुमाळ यांना ‘शनैश्वर भूमीपुत्र कृतज्ञता’ पुरस्कार, पुणे येथील शिवशंकर स्वामी यांना ‘शनैश्वर गोरक्षा कृतज्ञता’ पुरस्कार आणि जालिंदर सोळस्कर यांना ‘शनैश्वर प्रगतीशील शेतकरी कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी व्यासपिठावर शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी पू. नंदगिरी महाराज, द्वारकेचे सूर्याचार्य कृष्णादेवनंदगिरी महाराज, पुसेगावचे पू. सुंदरगिरी महाराज, महंत शांतिगिरी महाराज, महंत शितलगिरी महाराज आदी उपस्थित होते.
पुरस्कारानंतर धनंजय देसाई म्हणाले, ‘‘आपण हिंदु असल्याचा आपल्याला अभिमान हवा. देशाची सभ्यता आणि संस्कृती आपणच जपली पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती हाच ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया आहे.’’