५० बाल वारकऱ्यांच्या चमूने एका सुरात आणि एका तालात केले मृदंगवादन
सोलापूर – शहरातील महादेव मंदिर, जुनी लक्ष्मी चाळ येथे २२ मे ते २९ मे या कालावधीत सोलापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मृदंग तपस्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५० बाल वारकऱ्यांच्या चमूने एका सुरात आणि एका तालात एकत्रित मृदंग वादन केले. या मृदंग वादनाने वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानातील एकात्मिकतेचे सोलापूरवासियांना दर्शन घडले. अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले हे या वारकरी विद्यार्थ्यांना कीर्तन, भजन आणि भारुड यामध्ये मृदंग कसा वाजवावा ? याचे प्रशिक्षण देत आहेत. यामध्ये शास्त्रीय, सांप्रदायिक मृदंग वादन यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. त्यांच्या संस्थेतून अनेक विद्यार्थी मृदंगाचे धडे गिरवत आहेत.
या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्याठी स्वामी महाराज राशीनकर, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष भजन सम्राट बंडोपंत कुलकर्णी, संगीत विशारद सदाशिव चवरे, सर्वश्री संजय महाराज पाटील, बळीराम जांभळे, प्रभाकर वाघचवरे, अरुण भोसले, मोहन शेळके, दत्तात्रय भोसले, गणेश महाराज वारे, किरण शेटे, सुनील चांगभले, बजरंग महाराज डांगे, मारुति लोंढे, सुरेश गुंड, उत्तम ठाकर आदी उपस्थित होते.