‘जमीयत-उलेमा-ए-हिंद’ने समाजाला भडकावणे बंद करावे ! – विश्व हिंदु परिषद

विश्व हिंदु परिषदेचे नेते सुरेंद्र जैन

नवी देहली – देशात धर्मांधता वाढत असल्याचा कांगावा करणाऱ्या ‘जमीयत-उलेमा-ए-हिंद’वर विश्व हिंदु परिषदेने टीका केली आहे. परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटले की, मुसलमान नेत्यांनी त्यांच्या समाजाला भडकावणे बंद केले पाहिजे. मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या ‘निराधार घटनां’चा प्रसार करून २ धर्मियांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे अयोग्य आहे. जमीयतचे नेते मौलाना महमूद मदनी आणि बदरूद्दीन अजमल, तसेच अन्य नेते यांनी उत्तरप्रदेशच्या देवबंदमध्ये झालेल्या एका संमेलनात ‘भारतात मुसलमान पीडित आहेत’, अशी घोषणा केली होती. त्यावर जैन यांनी वरील विधान केले.

जैन पुढे म्हणाले,

१. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, तसेच काश्मीरपासून केरळपर्यंतचे कट्टरतावादी नेते त्यांच्या फुटीरतावादी धोरणाला पुढे रेटण्यासाठी राज्यघटना, न्याययंत्रणा आणि हिंदु समाज यांना आव्हान देण्यासाठी संघटित झाले आहेत.

२. भारताचे हे दुर्भाग्य आहे की, काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘मुसलमान तुष्टीकरण’ हा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू होता.

३. कट्टरतावादी नेत्यांनी त्यांच्या अनैतिक मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी भारतीय राजकारण्यांना धमकावले. भारताचे विभाजनही याच धोरणाचा परिपाक असल्याचेही जैन म्हणाले.