मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घटक राज्यदिनाच्या निमित्ताने घोषणा
पणजी, ३० मे (वार्ता.) – पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात कुंकळ्ळीवासियांनी केलेल्या उठवाचा दिवस म्हणजे १५ जुलै हा दिवस गोव्याचा ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी राज्याचे प्रतिनिधी देहली येथे जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वहातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या घटक राज्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केली. (कुंकळ्ळीवासियांच्या पोर्तुगिजांच्या उठावाला उचित स्थान देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन ! याचबरोबर कुंकळ्ळीवासियांच्या पोर्तुगिजांच्या विरोधात केलेल्या उठाव्याचा इतिहास शैक्षणिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची गोमंतकियांची मागणीही पूर्ण करावी, असे गोमंतकियांना वाटते ! – संपादक) दोनापावला येथील राजभवनातील ‘दरबार’ सभागृहात घटक राज्यदिनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.
LIVE : 35th Goa Statehood Day https://t.co/6CuhnmhT9Q
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) May 30, 2022
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘कुंकळ्ळीवासियांचा वर्ष १५८३ मधील उठाव हा पोर्तुगिजांच्या विरोधातील पहिला उठाव आहे. या उठावात कुंकळ्ळीवासियांनी पोर्तुगिज अधिकार्याबरोबरच ५ पाद्य्रांना कंठस्नान घातले होते. पुढे पोर्तुगिजांनी कपट कारस्थान करून १४ महानायकांची हत्या केली. कुंकळ्ळी येथील १४ महानायकांच्या स्मृतीप्रीतर्थ ग्रामस्थांनी स्मारक बानले आहे.’’ राज्यपालांनी त्यांच्या भाषणातून गोव्याच्या विकासाचै कौतुक केले. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते या वेळी गोव्याच्या विकासासाठी योगदान दिलेल्या व्यक्ती, आदी उद्योग समूह आणि संस्था यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याचसमवेत शैक्षणिक संस्था आणि कोकणी भाषा मंडळ या सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांचा, तसेच संशोधन क्षेत्रातील ‘आय.सी.ए.आर्.’ ही संस्था यांचा सन्मान करण्यात आला. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचा सन्मान त्यांची कन्या ज्योती बांदोडकर यांनी, दुसर्या मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांचा सन्मान त्यांचे पुत्र समीर काकोडकर, तर स्व. मनोहर पर्रीकर यांचा सन्मान त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी स्वीकारला. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, रवी नाईक, चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो, विल्फ्रेड डिसोझा (मरणोत्तर), लुईस प्रोत बार्बोझा (मरणोत्तर), फ्रान्सिस सार्दिन, दिगंबर कामत आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.