देशातील सर्व १०० वर्षे जुन्या मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण करावे !

सर्वोच्च न्यायालयात दोघा अधिवक्त्यांकडून याचिका

मशिदींमध्ये कुंड, विहिरी आदींच्या वापरावर प्रतिबंध घालण्याचही मागणी

नवी देहली – देशातील १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या मशिदींचे सर्वेक्षण पुरातत्व किंवा अन्य विभागांकडून करण्यात यावे. यातून तेथे हिंदु, शीख, बौद्ध किंवा जैन यांच्या धार्मिक स्थळांचे अवशेष आहेत का ? हे उघड होईल, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या सर्व मशिदींमधील लहान तलाव, विहिरी, कुंड येथे नमाजापूर्वी हात-पाय धुण्यास प्रतिबंध करावा, तसेच त्यासाठी त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अधिवक्ता शुभम अवस्थी आणि सप्तर्षि मिश्रा यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, मध्ययुगीन काळामध्ये मुसलमान आक्रमकांनी हिंदु, शीख, जैन आणि बौद्ध यांची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या होत्या. अशा ठिकाणी आजही या धर्मांतील प्राचीन पूजास्थळांचे अवशेष सापडू शकतात. आपापसांतील सहकार्य आणि सद्भाव यांच्यासाठी या अवशेषांचा सन्मान केला जावा आणि त्यांचे मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केला जावा; कारण असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यांत मुसलमान आक्रमणकर्त्यांनी मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या आहेत. जर सरकार असे गोपनीय सर्वेक्षण केले, तर अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. हे सर्वेक्षण गोपनीयच ठेवता येईल, जेणेकरून धार्मिक द्वेष आणि धार्मिक भावना दुखावण्यापासून वाचता येईल. या सर्वेक्षणाच्या वेळी तेथील विहीर अथवा कुंड यांमध्ये धार्मिक वस्तू सापडल्या, तर त्या संरक्षित करता येतील.