श्री हनुमानाचा जन्म अंजनेरी येथे नव्हे, तर किष्किंधा येथे झाला ! – स्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज, मठाधिपती, किष्किंधा, कर्नाटक

  • नाशिकमधील धर्मपंडितांशी चर्चा करणार

  • नाशिक येथील साधू-महंत हनुमानाचा जन्म अंजनेरी (नाशिक) येथे झाल्याच्या सूत्रावर ठाम !

स्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज

नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील अंजनेरी या श्री हनुमानाच्या जन्मस्थळावरून कर्नाटक राज्यातील किष्किंधा येथील मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ‘वाल्मीकि रामायणानुसार श्री हनुमानाचा जन्म अंजनेरी येथे नव्हे, तर किष्किंधा येथे झाला आहे’, असा दावा केला आहे.

‘ब्रह्मगिरीच्या कुशीतील अंजनेरी या गावाचे नाव श्री हनुमानाची माता अंजनी हिच्या नावावरून पडले आहे’, अशी आख्यायिका आहे. ‘तिचे पिता गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपस्या केली. त्यामुळे तिचे हे माहेर असून श्री हनुमानाचा जन्म येथेच झाला’, अशी येथील भाविकांची धारणा आहे. आख्यायिकेनुसार या गावाचे नावही अंजनेरी असून हे श्री हनुमानाचे जन्मस्थळ असल्याने येथे भाविकांचा मोठा राबता असतो. तथापि किष्किंधा येथील मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी श्री हनुमानाच्या जन्मस्थळावरून वेगळीच माहिती दिली असून त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी ते नाशिकमधील धर्मपंडितांशी चर्चा करणार आहेत. त्यांनी नाशिकमधील साधू-महंतांना ‘अंजनेरी ही श्री हनुमानाची जन्मभूमी असल्याचे सिद्ध करावे’, असे आव्हान दिले आहे.

३० आणि ३१ मे या दिवशी शोभायात्रा अन् धर्मसभा यांचे आयोजन !

स्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज म्हणाले, ‘‘माझी मोहीम कुणाच्याही विरोधात नाही. याविषयी अपप्रचार थांबवावा.’’ त्यासाठी ते ३० मे या दिवशी नाशिक येथे शोभायात्रा काढणार असून ३१ मे या दिवशी नाशिक येथील धर्ममार्तंडांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी ‘महर्षी पंचायतन पीठ’ येथे धर्मसभा आयोजित केली आहे. तथापि नाशिक येथील साधू-महंतांनी यास विरोध केला असून अंजनेरी ग्रामस्थही या विरोधात एकवटले आहेत.

नाशिकजवळील इगतपुरी येथील साधू-महंतांची अशी धारणा आहे की, कुशेगाव येथेही किष्किंधानगरी असून येथे श्री हनुमानाने प्रभु रामचंद्र आणि सुग्रीव यांची भेट घालून दिली. श्री शिवनाथ महाराज यांनी तर ‘प्रभु श्रीरामाच्या बाणाने निर्माण झालेले हेच ‘पंपा सरोवर’ आहे’, असा दावा केला आहे.

नवनाथ सारानुसार श्री अंजनीमातेची ही तपोभूमी हाच श्री हनुमानाच्या जन्माचा आधार आहे ! – श्री महंत ठाणापती ब्रह्मगिरीजी महाराज अशोकबाबा

श्री महंत ठाणापती ब्रह्मगिरीजी महाराज अशोकबाबा म्हणाले, ‘‘नवनाथ सारानुसार गौतम ऋषींची कन्या श्री अंजनीमाता यांची हीच तपोभूमी आहे. युद्धानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण येथे श्री अंजनीमातेला भेटण्यासाठी आल्याचेही  दाखले आहेत. श्री हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतली, त्या वेळी त्याच्या पायाच्या आकाराचा तलावही येथे आहे.’’

श्री हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या ७ टेकड्यांमधील अंजनाद्री पर्वत येथे झाला ! –  तिरुपति देवस्थान, आंध्रप्रदेश

काही दिवसांपूर्वी श्री हनुमानाच्या जन्मस्थळावरून कर्नाटकसह आंध्रप्रदेश राज्यातही वाद निर्माण झाला होता. ‘श्री हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या ७ टेकड्यांमधील अंजनाद्री पर्वत येथे झाला आहे’, असा दावा तिरुपति देवस्थानने केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘तिरुपति देवस्थानद्वारे खोटी माहिती प्रसारित करून खोटी गोष्ट सिद्ध केली आहे. वाल्मीकि रामायणातील पुराव्यांनुसार स्थान असून याविषयी चर्चा करण्यासाठी मी सिद्ध आहे.’’