संपादकीय
गोव्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करणारा पाद्री डॉम्निक डिसूजा याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती; मात्र २ दिवसांमध्येच जामीन संमत झाला आणि तो कारागृहाबाहेर आला. या संदर्भात बोलतांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, ‘आम्ही धर्मांतराच्या विरोधात लवकरच कायदा करू.’ मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने निश्चितच गोव्यातील हिंदू आशावादी बनले आहेत. भारतात फसवून आणि बळजोरीने केलेले हिंदूंचे धर्मांतर हा मोठा गंभीर विषय आहे. धर्मांतर रोखण्यासाठी सरकारी स्तरावर विशेष प्रयत्न होत नसले, तरीही हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या परीने धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. धर्मांतर रोखण्यासाठी प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचा मार खाणे, कारागृहात जाणे अशा दिव्यांना सामोरे जावे लागते. तरीही धर्मांतर रोखण्याचे कार्य ते इमानेइतबारे करतात.
ख्रिस्ती धर्मप्रचारकांना भारतात धर्मांतर करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा येतो. धर्मांतराच्या कारवाया करण्यासाठी ‘मानवतावादी सेवा’ देण्याच्या नावाखाली अनेक बलाढ्य संस्था कार्यरत आहेत. आशिया आणि विशेषत: भारत ख्रिस्तमय करण्याची घोषणा पोप यांनी केली होती. त्यांचे आवाहन कृतीत आणण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या नीतीने या ख्रिस्ती मिशनरी संस्था कार्यरत आहेत. डॉम्निक हे या संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी जादूचे प्रयोग करणे, हिंदूंच्या देवतांची निंदा करणे, हिंदूंची आवश्यकता ओळखून साहाय्य करणे आणि त्यानंतर त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणे असे प्रयत्न करण्यात येतात. हिंदूंची धर्मावरील श्रद्धा डळमळीत होण्यासाठी हे प्रयत्न असतात. आर्थिक स्थिती कमकुवत असलेले, पुरो(अधो)गामी, निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदु धर्मालाच नावे ठेवणारे जन्महिंदू त्यांच्या प्रचाराला भुलतात आणि धर्मांतरित होतात. भारतात धर्मांतराच्या कारवायांसाठी लागणारा पैसा विदेशातून मोठ्या प्रमाणात येत असल्याने, सरकारने ‘फेरा’ कायद्यात मोठी सुधारणा केली आहे. त्यामुळे विदेशी मिशनर्यांचे धाबे दणाणले. मोठ्या प्रमाणात येणार्या निधीचा पुरवठा ठप्प झाला. परिणामी हा पैसा बंद झाल्याने धर्मांतराचे कार्य कसे करायचे ? असा प्रश्न निर्माण झाला. त्यातल्या त्यात पंजाबसारखे राज्य, आदिवासीबहुल असलेली राज्ये त्यांना त्यांचे हक्काचे ठिकाण वाटू लागले. परिणामी तेथे धर्मांतराचे कार्य बिनबोभाट चालू झाले आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या कार्यक्रमांत आंधळा पाहू लागतो. बहिरा ऐकू शकतो. असे प्रकार करून हिंदूंमध्ये खोटी आशा निर्माण केली जाते. परिणामी हतबल झालेले हिंदू त्यांच्या जाळ्यात अडकतात. पोलिसांना तक्रार केल्यास त्यांना पुरावा द्यावा लागतो. अधिवक्त्यांच्या साहाय्य मिशनर्यांना उपलब्ध असते. त्यांचे काही राजकारण्यांशी हितसंबंधही असतात. याचा अपलाभ घेऊन ते सहज सुटत असल्याने धर्मांतराच्या विरोधात सक्षम राष्ट्रीय कायद्याची आवश्यकता आहे.