शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय !

डावीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छत्रपती संभाजीराजे

मुंबई – शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द मोडला. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. वर्ष २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्या वेळी लोकांची इच्छा होती की, सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्या समवेत आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा रहाणार आहे.’’

छत्रपती संभाजीराजे, तुम्ही नामी संधी घालवली ! – अरविंद सावंत, शिवसेना नेते

अरविंद सावंत

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतांना छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावर ‘छत्रपती संभाजीराजे, तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम असाल, तर आम्हीही आमच्या विचारांशी ठाम राहू. तुम्ही नामी संधी घालवली’, असे मत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

अरविंद सावंत पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असे कधीच घडले नाही. त्यांनी संभाजीराजे यांना ‘शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी’, असा प्रस्ताव ठेवला होता; मात्र त्यांनी तो नाकारला. राजांविषयी मला आश्चर्य वाटते, की त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. आम्ही काय अस्पृश्य होतो का ? तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम असाल, तर आम्हीही आमच्या विचारांशी ठाम राहू.’’