सोलापूर, २४ मे (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या आणि साधकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मूळच्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सनातनच्या साधिका श्रीमती कुसुम विष्णुपंत बारस्कर (वय ७८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ही आनंदवार्ता १७ मे या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संगात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दिली. या वेळी पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती होती.
सध्या श्रीमती कुसुम बारस्कर या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे त्यांची मुलगी सौ. अंजली दीक्षित यांच्याकडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या सत्संगाला श्रीमती बारस्कर आजींचे कुटुंबीय, तसेच अन्य साधक ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. डोंबिवली येथील सनातनच्या साधिका श्रीमती अमृता संभूस यांनी श्रीमती कुसुम बारस्कर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला श्रीमती बारस्कर आजींचे नातू श्री. आदित्य दीक्षित प्रत्यक्ष, तर श्री. मंगेश बारस्कर (मुलगा), सौ. वर्षा बारस्कर (सून) आणि कु. गिरीजा बारस्कर (नात) हे अंबाजोगाई येथून ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
मी काहीच केले नाही ! – श्रीमती कुसुम बारस्कर
मनोगत व्यक्त करतांना श्रीमती कुसुम बारस्कर म्हणाल्या, ‘‘इतके दिवस परात्पर गुरुदेवांनीच आमच्या कुटुंबाचा सांभाळ केला आहे. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वातीताई आणि पू. दीपालीताई यांनीच माझ्यासाठी प्रयत्न केले. मी काहीच केले नाही. तुमच्या तळमळीमुळेच झाले. आध्यात्मिक प्रगती झाल्याची वार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्या कुटुंबावर मोठी कृपा केली आहे ! – मंगेश बारस्कर (मुलगा)
आईमध्ये मूलत:च चिकाटी, सातत्य आणि तत्परता हे गुण आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईची प्रगती करून आमच्या कुटुंबावर मोठी कृपा केली आहे, त्यासाठी त्यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहे.
आजी परिस्थिती आनंदाने स्वीकारून साधना होण्यासाठी प्रयत्न करतात ! – पू. (कु.) दीपाली मतकर
या सत्संगात पू. (कु.) दीपाली मतकर यांनी श्रीमती कुसुम विष्णुपंत बारस्कर आजींची गुणवैशिष्ट्ये सांगतांना सांगितले की, आजींना पाहिले तरी पुष्कळ आनंद होतो. आजींना कितीही अडचणी असल्या, तरी त्या त्याविषयी कधीच तक्रार करत नाहीत. त्या परिस्थिती आनंदाने स्वीकारून साधना होण्यासाठी प्रयत्न करतात.