लोकसहभागातून सांगली महापालिकेत ‘मॉडेल स्कूल अभियान’ ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस

सांगली, २४ मे (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, तसेच ‘आभाळमाया फाऊंडेशन’ यांच्या वतीने लोकसहभागातून ‘मॉडेल स्कूल अभियान’ राबवण्यात येणार आहे. यासाठी मिरज शहरातील क्रमांक १९ या शाळेची निवड करण्यात आली आहे. यात लोकसहभागातून प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत, खेळाचे मैदान, बगीचा यांसह २ मजली आदर्श शाळा सिद्ध करण्यात येणार आहे. यात संगणकासह ‘डिजिटल क्लासरूम’, सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय, शाळेसाठी बस, बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग, खेळणी यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी २४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आभाळमायाचे प्रमोद चौगुले, महिला बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे-पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

महापालिका आयुक्त पुढे म्हणाले, ‘‘या उपक्रमासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी २५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे ठरवले आहे. सुट्टीच्या कालावधीत महापालिकेच्या शिक्षकांनी केवळ १ आठवडा सुट्टी घेतली असून ते विद्यार्थी प्रवेशासाठी धडपडत आहेत. बालवाडीसाठी आताच ५०० च्यावर प्रवेश झाले आहेत. सध्या महापालिकेकडे ५० शाळा असून प्रत्येक शाळेत ‘इंटरनेट’ (मायाजाळ) पोचवले आहे. ही शाळा ‘मॉडेल स्कूल अभियाना’त पूर्ण झाल्यावर अन्य शाळाही टप्प्याटप्याने विकसित करण्यात येणार आहेत.’’

या प्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘‘महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षण यांसाठी विशेष व्यवस्था केली असून या योजनेसाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही. ’’