अंडाशयावरील गाठ ! घाबरुन न जाता समजून घ्या !

१. अंडाशयावर गाठ आल्यास घाबरून न जाता स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करून घ्यावे !

‘डॉक्टर, माझी पाळी गेल्या ६ मासांपासून अचानकपणे अनियमित झालीय, पोटात सतत थोडे दुखत रहाते. आता १०  दिवस झाले, रक्त थांबतच नाही’, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन महिला रुग्ण येतात. ‘सोनोग्राफी’ करतांना लक्षात येते की, बऱ्याच वेळा डाव्या किंवा उजव्या अंडाशयावर (ओव्हरीवर) पाण्याच्या फुग्यासारखे ‘सिस्ट’(गाठ) दिसते.

गाठ म्हटल्यावर ‘कर्करोग’ हा एकच विचार रुग्णांच्या मनात येतो आणि उगाचच घाबरगुंडी उडते. पाळी चालू झाल्यापासून ते थांबेपर्यंत कोणत्याही वयात अशा साध्या गाठी अंडाशयावर येऊ शकतात. तसेच त्या कर्करोगाच्या असण्याची शक्यता फारच अल्प असते. या गाठी ‘हॉर्मोन्स’च्या (संप्रेरकाच्या) असंतुलनामुळे होतात. त्याचे निदान लवकर झाले नाही, तर त्या आकाराने वाढत जातात आणि त्रासदायक ठरू शकतात.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

२. अंडाशयावर गाठी होण्याची कारणे

या गाठींचे विविध प्रकार आहेत. साध्या पाण्याने भरलेल्या फुग्यासारख्या गाठींना ‘सिम्पल सिस्ट’ किंवा ‘फंक्शनल सिस्ट’ म्हणतात. ज्या स्त्रियांची पाळी अनियमित आहे, अशा स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळून येते. नियमित पाळी असलेल्या स्त्रियांमध्ये  पाळीच्या साधारण १० व्या ते १५ व्या दिवशी स्त्रीबीज निर्माण होते आणि त्यानंतर १४ दिवसांनी पाळी येते. काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्माण होऊन फुटण्याची प्रक्रिया नीट होत नाही आणि मग आकाराने मोठे झालेले स्त्रीबीज न फुटल्यामुळे त्याचे रूपांतर गाठीमध्ये होते. परिणामी स्त्रीची पाळी पुढे जाते आणि हॉर्मोन्सचे असंतुलन वाढून गाठीचा आकार वाढत जाऊ शकतो.

३. अंडाशयाच्या गाठींवर उपचार करणे शक्य असल्याने काळजी करण्याची आवश्यकता नसणे

अनियमित पाळी असलेल्या प्रत्येकच स्त्रीला ‘सिस्ट’चा त्रास होईल असे नाही. काही रुग्णांना हा त्रास अधिक प्रमाणात जाणवू शकतो. यात ‘कॉम्प्लेक्स ओवॅरिअन सिस्ट’ हा अजून एक प्रकार असतो. या गाठीत नुसते पाणी नसून त्याची अंतर्गत रचना अधिक गुंतागुंतीची असते. अशा गाठींकडे बारीक लक्ष ठेवून उपचार करावे लागतात. यामध्ये ‘डरमॉईड सिस्ट’, ‘सिस्टॅडेनोमा’ (cystadenoma) वगैरे विविध प्रकार दिसून येतात.

अंडाशयाच्या साध्या गाठी काही वेळा आपोआप विरघळतात किंवा काही औषधांनी उपचार करून विरघळवता येतात. अर्थात् यासाठी वेळोवेळी ‘सोनोग्राफी’ करण्याची आवश्यकता असते. या गाठी विरघळवण्यासाठी अंडाशयाचे कार्य नियंत्रणात (सप्रेशन ऑफ ओवॅरियन फंक्शन) आणावे लागते. त्यासाठी हॉर्मोन्सच्या गोळ्यांचा वापर करता येतो. अशा वेळी हॉर्मोन्सच्या गोळ्यांची अनाठायी भीती मनात बाळगू नये आणि स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.

४. पाळी थांबलेल्या स्त्रियांनी प्रतिवर्षी निदान एकदा ‘सोनोग्राफी’ करून घेणे अत्यावश्यक !

अंडाशयाच्या गाठीची एक गुंतागुंत, म्हणजे या गाठीला पीळ पडणे. असे झाल्यास परिस्थिती गंभीर होते आणि तातडीने शस्त्रक्रिया करून हा पीळ सोडवणे आवश्यक असते. ही शस्त्रक्रिया वेळेत न झाल्यास पीळ पडल्याने अंडाशयाचा रक्तप्रवाह बंद होतो आणि ती काळी निळी पडून त्याचे ‘गँगरीन’ होऊ शकते. परिणामी शस्त्रक्रिया करून अंडाशय लगेच काढून टाकायची वेळ येते. त्यामुळे कधी कधी रुग्णांच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.

‘कॉम्प्लेक्स ओवॅरियन सिस्ट’  म्हणजे गुंतागुंत असलेली गाठ अतिशय काळजीपूर्वक हाताळावी लागते. त्यातील विविध प्रकाराप्रमाणे उपचार करावे लागतात. काही गाठी केवळ औषधांनी बऱ्या होतात, तर काहींना शस्त्रक्रिया करावीच लागते. अंडाशयाचा कर्करोग वयस्कर स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळत असला, तरी क्वचित् तो तरुण मुलींमध्येही आढळू शकतो. पाळी थांबलेल्या स्त्रियांनी प्रतिवर्षी निदान एक ‘सोनोग्राफी’ करून घेणे अत्यावश्यक आहे; कारण त्याखेरीज अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान होऊ शकत नाही. अन्नपचनाच्या समस्या, पोट फुगल्यासारखे वाटणे, मळमळ होणे अशी अगदीच सामान्य लक्षणे असल्याने हा कर्करोग फार पुढच्या स्तराला जाईपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळे पाळीची किंवा पोटाची कोणतीही तक्रार फार दिवस अंगावर काढू नये. अन्यथा ते धोकादायक ठरू शकते.

५. अंडाशयाच्या गाठीविषयी भीती न बाळगता तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावे !

अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान काही रक्ताच्या तपासण्यांमधूनही होऊ शकते. एखादी गाठ शंकास्पद वाटली, तर त्या रुग्णांची ‘सीरम सीए १२५ लेवल्स’ ही तपासणी करून साधारण अंदाज येऊ शकतो, तसेच एम्आरआय, सीटी स्कॅन अशा तपासण्याही केल्या जातात. वेळेत निदान झाल्यास अंडाशयाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊन स्त्री पुढे साधारण आयुष्य जगू शकते. थोडी जागरूकता असेल, तर जवळपास सर्वच आजारांना हे लागू होते. मग आता यापुढे अंडाशयाची गाठ आहे, असे कुणाविषयीही आणि कुठेही ऐकले की, घाबरून न जाता ही माहिती आपल्या जीवलगांना सांगावी. भयाचा अंधःकार ज्ञानाच्या दिव्यांनीच दूर होऊ शकतो.’

– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे