परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी गोव्यातील सौ. उज्ज्वला कामटेकर यांना आलेल्या अनुभूती

१. गुरुदेवांच्या चरणकमलाचे मानस पूजन करतांना आपण केलेले मागणे त्यांच्यापर्यंत पोचते, याची जाणीव होऊन भाव जागृत होणे

सौ. उज्ज्वला कामटेकर

जन्मोत्सवाच्या पंधरा दिवस अगोदर गुरुदेवांच्या चरणकमलाचे मानस पूजन झाल्यावर मी त्यांच्याकडे एक मागणे केले होते, ‘हे गुरुदेवा, या वर्षी आम्हा साधकांना तुमचा जन्मोत्सव सोहळा अनुभवता येऊ दे.’ ज्या वेळी उत्तरदायी साधकाने ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘ऑनलाईन’ जन्मोत्सव सोहळा घरीच पहायला मिळेल’, असे सांगितले, त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘गुरुदेवांच्या चरणी माझी प्रार्थना पोचली’, असे वाटून माझा भाव दाटून आला. ‘देव भक्तासाठी काय काय करतो ! किती कष्ट घेतो !’, हे मला अनुभवायला मिळाले.

२. गुरुदेवांचे स्मरण होतांना ‘त्यांच्या श्री चरणांतून चैतन्य येतांना दिसून घराभोवती चैतन्य निर्माण झाले आहे’, असे वाटणे आणि त्यामुळे परिसरातील झाडांना अधिक फळे-फुले येणे

जन्मोत्सवाच्या ८ दिवस आधीपासून मला रात्री झोपतांना गुरुमाऊलीचे चरणकमल दिसत होते. कधी कधी पांढराशुभ्र झब्बा घातलेले तेजस्वी गुरुदेव दिसायचे. तेव्हा ‘प.पू. गुरुदेवच माझ्या मनात भाव निर्माण करत आहेत’, असे मला वाटले. मला त्यांच्या श्री चरणांतून माझ्या दिशेने चैतन्य येतांना दिसायचे आणि ‘आमच्या घराभोवती चैतन्य निर्माण झाले आहे’, असे वाटायचे. घरात जाणवणाऱ्या या चैतन्याने या वर्षी परिसरातील झाडांना फळे आणि फुले चांगली आली आहेत.

३. जन्मोत्सवाची सिद्धता करतांना घरात उत्साह आणि आनंद जाणवून अष्टसात्त्विक भाव जागृत होणे

१३.५.२०२० या दिवशी घरी जन्मोत्सवाची सिद्धता करतांना मला उत्साह जाणवत होता. एरव्ही घराची स्वच्छता करतांना मला पुष्कळ त्रास होतो; पण या दिवशी मला वेगळाच उत्साह जाणवत होता. मला एवढा आनंद होत होता की, गुरुमाऊली घरी येणार आहे, असे वाटून ‘काय करू अन् काय नको ?’, असे मला झाले होते. प्रत्येक क्षणी गुरुमाऊलीच्या कृपेने कंठ दाटून येऊन माझा अष्टसात्त्विक भाव जागृत होत होता. प्रत्येक कृतीला भावाची जोड दिल्याने घरात किंवा बाहेर फिरतांना मला अतिशय हलके वाटत होते.

४. साधकांना घरात वेगळेपण जाणवून ‘गुरुमाऊली घरात विराजमान आहे’, असे वाटणे

काही साधक आमच्या घरी हा कार्यक्रम बघायला आले होते. त्यांनाही घरात वेगळेपण जाणवत होते. त्यांना ‘घराची शुद्धी झाली असून घर चैतन्याने न्हाऊन गेले आहे’, असे वाटत होते. ‘कार्यक्रम चालू झाल्यावर प्रत्यक्ष गुरुमाऊली घरात विराजमान झाली आहे’, असे मला वाटले.

५. गुरुदेवाचा सत्संग ऐकण्यासाठी एक पक्षीही (मैनाही) घराजवळ येणे

आमच्या घराच्या परिसरात या दिवसांत चिमण्यांचा चिवचिवाट असतो. घरात जिथे बसून मी प्रतिदिन भावसत्संग ऐकते, तेथे बाजूला एका मैनेने घरटे बांधले आहे. ‘तीही हा कार्यक्रम ऐकत आहे’, असे मला वाटते. मी सत्संग ऐकत असतांना ती घरट्यापाशीच अधिक वेळ असते. तेव्हाही वाटते की, ती गुरुदेवाचा सत्संग ऐकायला आली आहे.

– सौ. उज्ज्वला कामटेकर, गोवा (मे २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक