खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद

मुंबई, २३ मे (वार्ता.) – ‘राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांच्या तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा दर अधिकतम दीडपटीपर्यंत आकारता येईल’, असा शासनाचा निर्णय आहे; मात्र हा शासननिर्णय धाब्यावर बसवून अनेक खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांकडून दुपटीहून अधिक तिकीट दर आकारून प्रवाशांची भरमसाठ लूट केली जात आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभागाने ठोस कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी २३ मे या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार, तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तक्रार करणारे श्री. अभिषेक मुरुकटे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सागर चोपदार, श्री. सतीश कोचरेकर आणि श्री. अभिषेक मुरुकटे

शासनाच्या निर्णयाप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांच्या नोंदणी करणारी, तसेच गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्‍चित केलेले दरपत्रक लावावे. त्याविषयी प्रवाशांना जर तक्रार करायची असेल, तर त्यासाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक द्यावा. लूट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर तात्काळ कारवाई करावी, तसेच ऑनलाईन तिकीटविक्री करतांना भरमसाठ दर आकारणार्‍या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सची तिकीट विक्री करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा मागण्याही हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत करण्यात आल्या.

राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना पाठीशी घालणार्‍या परिवहन आयुक्तांवर कारवाई करा !

याविषयी तक्रार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी त्यांनी तक्रारदारांना आश्‍वासित करण्याऐवजी दायित्व झटकणारे उत्तर दिले. यावर ‘परिवहनमंत्र्यांनी परिवहन आयुक्तांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी या वेळी श्री. सतीश कोचरेकर यांनी केली.

‘संकेतस्थळावरील तक्रारीमुळे काम वाढेल’, असे म्हणणारे आयुक्त वेतन कसले घेतात ?

शिष्टमंडळाने परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे नियमबाह्य तिकीटदर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या नावांची सूची पुराव्यांसह सुपुर्द केली. त्या वेळी आयुक्तांनी याची नोंद घेण्याचे दूरच; पण शिष्टमंडळाने दिलेली कागदपत्रे पहाण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. याउलट त्यांनी तक्रारदारांना ‘कुणी अधिक पैसे घेतल्यास अन्य ट्रॅव्हल्सचे तिकीट काढा. ‘ऑनलाईन वेबसाईट’वरून आकारल्या जाणार्‍या किमतीवर आमचे नियंत्रण नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याएवढे मनुष्यबळ आमच्याकडे नाही. कारवाईची माहिती संकेतस्थळावर दिली, तर आमचा उपद्व्याप वाढतो. आम्ही आमच्या सोयीनुसार कारवाई करतो’, असे दायित्वशून्यतेचे उत्तर दिले. डॉ. ढाकणे हे परिवहन आयुक्त आहेत कि जनतेची लूट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवक्ते ? परिवहन आयुक्तच त्यांचे दायित्व झटकत असतील, तर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट कशी थांबणार ? ‘डॉ. ढाकणे यांचे आणि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे काही साटेलोटे आहेत का ?’, याचीही सखोल चौकशी शासनाने केली पाहिजे. ‘संकेतस्थळावरील तक्रारींमुळे काम वाढेल’, असे म्हणणारे आयुक्त वेतन कसले घेतात ? असा प्रश्‍न श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थित केला.

राज्यातील लाखो प्रवाशांची प्रतिदिन कोट्यवधी रुपयांची लूट ! – अभिषेक मुरुकटे, तक्रारदार

मी खासगी बसमधून प्रवास करतांना माझ्याकडून तिकिटाचे ७३५ रुपये अधिक घेण्यात आले. या प्रकारानंतर मी विविध खासगी ट्रॅव्हल्सचे दर पाहिले असता बहुतांश गाड्यांचे दर भरमसाठ असल्याचे आढळून आले. एका प्रवाशाकडून ७३५ रुपये एवढी अतिरिक्त रक्कम घेतली जात असेल, तर राज्यभरातील लाखो प्रवाशांकडून किती रुपये उकळले जात असतील, याची कल्पना येते. राज्यातील लाखो प्रवाशांची अशा प्रकारे होणारी नियमित फसवणूक त्वरित थांबवायला हवी.

…तर समितीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा ! – सागर चोपदार, मुंबई, ठाणे, रायगड समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सर्वसामान्यांची उघडपणे होत असलेली लूट हा गंभीर विषय आहे. याविषयी नागरिकांनी आवाज उठवावा. कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.