कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये वर्ष २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत आलो रानी या बांगलादेशी महिलेला तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. आलो रानी यांचे नाव भारतातील मतदार सूचीमध्ये असण्यासह बांगलादेशातील मतदार सूचीतही असल्याचे उघड झाले आहे. वर्ष २०१२ मध्ये आलो रानी यांचे नाव भारताच्या मतदार सूचीत नोंदवण्यात आले होते. त्यानंतर त्या बांगलादेशात गेल्या आणि तेथेही त्यांचे नाव मतदार सूचीत नोंदवण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीत पराजित झाल्यावर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावरून सुनावणीच्या वेळी आलो रानी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले.
१. आलो रानी यांनी सांगितले होते की, त्यांचा जन्म बंगालच्या हुगळी येथे वर्ष १९६९ मध्ये झाला. बांगलादेशी नागरिकाशी विवाह झाल्यानंतरही त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडले नव्हते आणि आता पती समवेत रहात नसल्याचे त्यांनी सांगितले. पारपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड भारताचे आहेत, तसेच भूमीही भारतात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. चौकशीमध्ये त्यांचा जन्म भारतात झाला नसल्याचे आणि वर्ष २०१२ मध्ये मतदार सूचीमध्ये नाव घातल्याचे उघड झाले.
२. न्यायालयाने निर्णय देतांना सांगितले की, पारपत्र, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड हे नागरिकतेचे पुरोवे होत नाहीत. आलो रानी यांच्याकडे बांगलादेशचे मतदान ओळखपत्र सापडले. विवाहही तेथील नागरिकाशी झाला आहे. त्यांचे नाव तेथील मतदार सूचीतून काढल्याचे स्पष्ट झाले नाही. त्यांची आई आणि भाऊ आजही बांगलादेशात रहातात. भारतात दुहेरी नागरिकता लागू होत नाही. त्यामुळे त्यांना भारतीय नागरिक म्हणू शकत नाही.
संपादकिय भूमिका
अन्य देशाच्या नागरिकांना उमेदवारी देणारी तृणमूल काँग्रेस राष्ट्रघातकीच होत ! अशा पक्षांवर कारवाई झाली पाहिजे !