मुंबई – अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे मुंबईतील गोवावाला कंपाऊंड हडप करण्यासाठी दाऊद टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण मुंबई विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी नोंदवले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्यांच्याविरुद्ध प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राची नोंद न्यायालयाने घेतली आहे. ‘मनी लाँड्रिग’ प्रकरणात (अवैध म्हणजेच काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकरणात) नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत.
मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शाहवली खान यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. ‘डी-गँग’शी संपर्क ठेवूनच मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात मलिक जाणीवपूर्वक सहभागी आहेत. ‘ईडी’ने त्यांच्या आरोपपत्रात १७ जणांना साक्षीदार बनवले आहे. दोषारोपपत्राची नोंद घेत न्यायालयाने नवाब मलिक आणि वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील दोषी सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.