जिल्ह्यातील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याचा निर्धार !
यवतमाळ, २० मे (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आयोजित दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनामध्ये काश्मिरी हिंदूंची समस्या, देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल प्रमाणपत्र, धर्मांतर, हिंदूंच्या शोभायात्रांवरील आक्रमणे, हिंदूंच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटितपणे, तसेच संवैधानिक मार्गाने कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार शहरासह वणी, पुसद, उमरखेड, घाटंजी, कारंजा येथील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.
सहभागी संघटना
दीनदयाल प्रबोधिनी, विवेकानंद केंद्र, महिला उत्थान समिती, वारकरी संप्रदाय, पतंजली योग समिती, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय वारकरी परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, चेंबर ऑफ कॉमर्स, रा.स्व. संघ, दासबोध संघटना, पुरोहित संघटना, आध्यात्मिक मंच, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती यांसह प्रवचनकार, अधिवक्ते, पत्रकार, उद्योजक, धर्मप्रेमी इत्यादी १०० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी होते.
हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने भगवंताचे अधिष्ठान ठेवा ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने भगवंताचे अधिष्ठान ठेवायला हवे, तसेच साधनेला महत्त्व देऊन हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हावे.
१२५ वी घटनादुरुस्ती हिंदु राष्ट्राची होऊ शकते ! – अधिवक्ता अजय चमेडिया, हिंदुत्वनिष्ठ
बहुमताच्या आधारे हिंदु राष्ट्राची मागणी करणे संवैधानिक आहे. आतापर्यंत १२४ वेळा घटनादुरुस्ती झालेली आहे. १२५ वी घटनादुरुस्ती हिंदु राष्ट्राची होऊ शकते. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेशी समांतर असलेल्या हलाल प्रमाणपत्राचे धोके सांगितले.
शेवटी हिंदु राष्ट्राविषयी परिसंवाद घेण्यात आला. त्यामध्ये हिंदु राष्ट्राविषयी असलेल्या आक्षेपांचे खंडण करण्यात आले. त्यानंतर ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हिंदुहिताचे ठराव पारित करण्यात आले.