देहलीतील ‘औरंगजेब लेन’ला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ नाव देण्याची भाजपची मागणी

नवी देहली – येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’, असे विधान देहली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष वासू रखड यांनी केले आहे.

वासू रखड म्हणाले, ‘‘औरंगजेबासारख्या आक्रमणकर्त्याने आमच्या देवाचे मंदिर पाडले. बाबा विश्‍वनाथाचे मंदिर पाडले. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत एक शिवलिंग होते. आज आम्ही ‘औरंगजेब लेन’चे ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे नाव देण्याची मागणी घेऊन आलो आहोत. देहली सरकारने या रस्त्याला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे नाव द्यावे, अशी आमची इच्छा आहे. मोगल आक्रमकांनी आमच्या देवाचे मंदिर पाडले हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. त्यांचा इतिहास आम्हाला संपवायचा आहे. हे नाव इतिहासाच्या कोणत्याही पानावर, कोणत्याही रस्त्यावर लिहावे, असे आम्हाला वाटत नाही.’’