काँग्रेस सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष ! – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल

डावीकडून हार्दिक पटेल सोनिया गांधी आणि राहूल गांधी

कर्णावती (गुजरात) – काँग्रेस सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष आहे, असे विधान काँग्रेसचे त्यागपत्र दिलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केलेे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हार्दिक पटेल म्हणाले की, काँग्रेसचा राज्य कार्यकारी अध्यक्ष असतांना पक्षाने मला कोणतेही दायित्व सोपवले नाही. कार्याध्यक्षांचे दायित्व केवळ कागदावर होते. भाजपामध्ये प्रवेश करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव !

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, गुजरात आणि गुजराती यांच्याविषयी द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होते. मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र जेव्हा जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही सूत्रांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा ते (राहुल गांधी यांचे) भ्रमणभाष पहाण्यात अधिक गुंतल्याचे आढळले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले. देशाला किंवा पक्षाला आवश्यकता असतांना काही नेते परदेशात मौजमजा करत होते.

संपादकीय भूमिका

  • हार्दिक पटेल हेही काही धुतल्या तांदुळासारखे नाहीत. पाटीदार समाजाच्या कथित हक्कांसाठी त्यांनी केलेले हिंसक आंदोलन जनता विसलेली नाही. काँग्रेसमध्ये राजकीय पोळी भाजता आली नाही; म्हणून त्यांनी पक्षत्याग केला आहे, हे जनता ओळखून आहे !
  • काँग्रेसमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर हार्दिक पटेल यांना हे लक्षात आले; मात्र काँग्रेस वर्ष १९२० पासून म्हणजे मोहनदास गांधी यांचा काँग्रेसमध्ये उदय झाल्यापासून जातीयवादी पक्ष झाला आहे, हा इतिहास त्यांनी आधीच का समजून घेतला नाही ?