काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाने ठरवले दोषी !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले असून मलिकला दोषी ठरवण्यात आले आहे. काश्मीर खोर्‍यात आतंकवादासाठी निधी पुरवल्याप्रकरणी न्यायालयाने मलिकच्या अर्थिक स्थितीचा आढावा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ मे या दिवशी होणार आहे.

काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देण्यापासून हवाई दलाच्या अधिकार्‍यांची हत्या, हाफिज सईदशी भेट, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या मुलीचे अपहरण, असे अनेक आरोप यासीन मलिकवर आहेत. या आरोपांना मलिकने आव्हान न देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्याने एकप्रकारे आपल्या गुन्हेगारी कृत्यांची स्वीकृती दिल्याचे सांगितले जात आहे.


भारताने यासीन मलिक याच्या विरोधात ‘कपोलकल्पित आरोप’ केल्याचा पाकचा थयथयाट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या विदेश मंत्रालयाने भारतीय दूतावासातील प्रमुख अधिकार्‍याला समन्स पाठवले असून त्यामध्ये भारताने यासीन मलिक याच्या विरोधात ‘कपोलकल्पित आरोप’ केल्याचे म्हणत भारतावर टीका केली आहे. काश्मिरी नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा या माध्यमातून भारत सरकार प्रयत्न करत असल्याचेही पाकचे म्हणणे आहे. मलिक याला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करावे, अशी पाकने भारताकडे मागणी केली आहे.