परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नाशिकमधील साधूसंतांकडून दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद !
नाशिक, १८ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे आयोजित करण्यात आलेली हिंदू एकता दिंडी नाशिककरांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची पर्वणीच ठरली. ‘जय श्रीरामा’चा जयघोष आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या नावाचा जयघोष करत नाशिककर दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निश्चय केला. धर्मध्वज पूजनाने दिंडीला प्रारंभ झाला. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक श्री. जयंत भातांब्रेकर यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन पार पडले. महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नाशिकमधील सर्व साधूसंतांनी दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे पूजन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पालखी पूजन होताच ‘जय श्रीरामा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
श्री मोदकेश्वर गणरायाचे आशीर्वाद घेऊन दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीच्या पुढे धर्मध्वज आणि साधू-संत यांनी दिंडीचे नेतृत्व केले. रस्त्याच्या दुतर्फा पालखीच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी आणि ‘जय श्रीरामा’च्या जयघोषाने परिसर दिंडीशी एकरूप होत आहे’, असे लक्षात येत होते. प्रतिष्ठित, मान्यवर आणि सामान्य नागरिक यांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. काही सामान्य नागरिकांनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे पूजन केले. स्वरक्षण प्रशिक्षण पथकातील कार्यकर्त्यांनी एका चौकामध्ये प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक चालू केल्यानंतर तेथील नागरिक आपापले काम सोडून स्तब्ध होऊन प्रशिक्षण बघत होते. नागरिक दिंडीच्या मार्गावर येणारी-जाणारी वाहने स्वतःहून बाजूला घेत होते. भावपूर्ण वातावरणात चालू झालेल्या दिंडीची सांगताही भावपूर्ण वातावरणात झाली.
हिंदु धर्मद्वेष्ट्यांना उत्तर देण्यासाठी हिंदू एकता दिंडीचे आयोजन ! – सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव
हिंदू एकता दिंडी ही हिंदूंच्या महासंघटनाचे प्रदर्शन करण्यासाठी आणि हिंदु धर्मद्वेष्ट्यांना उत्तर देण्यासाठी आहे. हिंदूंचा स्वाभिमान आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी आहे. जेव्हा सकल हिंदु शक्ती एकत्रित दिसेल, जेव्हा हिंदूंची एकता आविष्कृत होईल, तेव्हा तिची वज्रमूठ दिसेल आणि त्याक्षणी हे हिंदु राष्ट्र साकार होईल.
हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून सर्व हिंदु संघटना आणि संप्रदाय यांनी एकत्र येणे हा काळमहिमाच ! – गौरव जमधडे, नाशिक जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून सर्व हिंदु संघटना आणि संप्रदाय यांनी एकत्र येणे हा काळमहिमाच आहे. हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आपण सर्वांनी धर्मरक्षणाचे दायित्व घेऊन एकत्र येऊन पुढचे नियोजन करायला हवे, हीच श्री काळारामाची इच्छा ! कंसाला जसा श्रीकृष्ण प्रत्येक ठिकाणी दिसायचा, जसे रावणाला श्रीराम दिसायचा, जसे औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे, तसे हिंदुद्वेष्ट्यांना हिंदु राष्ट्रच दिसत आहे…म्हणजे ते येणारच !
एकसंघ राहून आपण देव, धर्म आणि देश यांची अखंड सेवा करू ! – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज
दिंडीत उपस्थित असणारे सर्व हिंदु बांधव आणि भगिनी यांचे आभार ! सर्व ज्येष्ठ नागरिक, धर्मगुरु आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे विशेष आभार ! असेच एकसंघ राहून आपण देव, धर्म आणि देश यांची अखंड सेवा करू !
क्षणचित्रे
१. दिंडीसमवेत असणाऱ्या पोलिसांनी सांगितले, ‘‘दिंडी एकदम व्यवस्थित होती. संपूर्ण कार्यक्रम सुनियोजित आणि शिस्तबद्ध होता. आम्ही प्रथमच अशी दिंडी पाहिली. तुमचे कार्यकर्तेच चांगले नियोजन करत होते.’’
२. भाजपच्या सौ. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘हे हिंदु राष्ट्रच आहे’, यात शंका नाही.’’
३. समाजातील काही जण उत्स्फूर्तपणे बालसाधकांची, तसेच दिंडीची छायाचित्रे काढत होते, तसेच व्हिडिओ चित्रीकरणही करत होते.
४. ‘दिंडीचे आयोजन उत्कृष्ट होते’, असे भाजपचे नेते सुनील खोडे म्हणाले.