नवी देहली – रिजर्व बँकेने जनतेला आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध रहाण्याची चेतावणी दिली आहे. गेल्या काही कालावधीत लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यावर बँकेने यासंदर्भात जनतेला सूचना केली आहे. बँकेने म्हटले की, आम्ही कधीच दूरभाष अथवा ई-मेल यांद्वारे ग्राहकांना संपर्क करत नाही अन् पैसेही मागत नाही. आमच्याकडून अशी कोणतीच वैयक्तिक माहितीही अशा प्रकारे मागितली जात नाही.
बँकेने पुढे म्हटले की, आम्ही कुणाचा पैसा अथवा विदेशी चलन अथवा अन्य कोणत्याही प्रकारची रक्कम ठेवून घेत नाही. कुणाच्या नावे आम्ही खातेही उघडत नाही. बँकेचे कर्मचारी असल्याचे खोटे सांगून कुणी तुमच्याकडून माहिती मागत असेल, तर त्यांच्या बोलण्यात येऊन फसू नका, असे आवाहनही बँकेने केले आहे.