इतरांचा विचार करणारे आणि संतांप्रती अपार कृतज्ञताभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७६ वर्षे) !

वैशाख कृष्ण प्रतिपदा (१७ मे २०२२) या दिवशी  पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा ७६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. रिचा वर्मा यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

(पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. इतरांचा विचार करणे

साधक पू. चपळगावकर काकांकडे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने नेऊन देतात. तेव्हा पू. काका ‘कोण साधक येणार आहेत ? ते किती वाजता येणार आहेत ? त्यांच्याकडे किती रक्कम द्यायची आहे ?’, हे आधीच विचारून घेतात. त्यानुसार पू. काका तेवढी रक्कम आधीच काढून ठेवतात, जेणेकरून त्या साधकाला प्रतीक्षा करावी लागू नये आणि त्याचा वेळ वाया जाऊ नये.

२. प्रामाणिकपणा

सौ. रिचा वर्मा

२ वर्षांपूर्वी त्यांना पित्ताचा त्रास होत होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या वाहनचालकाकडून औषधाची दोन पाकिटे मागवली होती. सायंकाळी द्वारपालाने (वॉचमनने) त्यांना औषधाची आणखी काही पाकिटे आणून दिली. तेव्हा पू. काकांनी त्यांना विचारले, ‘‘मी ही औषधे मागवली नव्हती, तर कुणी आणून दिली ?’’ तेव्हा द्वारपालाने सांगितले, ‘‘चारचाकीने कुणीतरी आले होते. त्यांनी मला ही पाकिटे तुम्हाला द्यायला सांगितली होती.’’ ही गोष्ट केवळ पू. काका, द्वारपाल आणि वाहनचालक यांनाच ठाऊक होती. तेव्हा पू. काकांनी औषधांच्या दुकानदाराला भ्रमणभाष केला.

दुकानदाराने पू. काकांना सांगितले, ‘‘मीच तुम्हाला ४ पाकिटे द्यायला सांगितली होती; कारण काल तुमचा वाहनचालक जे औषध घेऊन आला होता, त्याची मुदत (एक्सपायरी डेट) संपली होती.’’ तेव्हा पू. काका म्हणाले, ‘‘परंतु तुम्ही ४ पाकिटे पाठवली आहेत.’’ दुकानदार म्हणाले, ‘‘माझ्याकडून चूक झाली होती; म्हणून मी तुम्हाला ४ पाकिटे पाठवली.’’ तेव्हा पू. काकांनी २ पाकिटे दुकानदाराला परत केली. पू. काका म्हणाले, ‘‘मला भगवंताला तोंड दाखवायचे आहे.’’

३. व्यवसाय कर कार्यालयात जाऊन स्वतःहून कराच्या रकमेविषयी विचारणे आणि लगेच ती रक्कम भरणे

काही दिवसांपूर्वी पू. काकांनी व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) कार्यालयात जाऊन विचारले, ‘‘मी किती पैसे द्यायचे बाकी आहेत ?’’ तेथे त्यांना जेवढी रक्कम सांगितली, तेवढी रक्कम त्यांनी त्वरित भरली. ते म्हणाले, ‘‘दुसऱ्या दिवसाचीही वाट पहायला नको. उद्याचा काय भरवसा ? जर कुणाचे देणे बाकी राहिले, तर त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल.’’

४. संतांप्रतीचा कृतज्ञताभाव

एकदा पू. काकांच्या डोळ्यांना त्रास होत होता. तेव्हा एका साधकाने त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेले उपनिषदातील श्लोक पाठवले होते. पू. काका ते श्लोक दिवसभरात १० – १५ वेळा ऐकत होते. काही दिवसांनंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर पू. काका देवद आश्रमात गेले होते. तेव्हा त्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या समाधीस्थानावर जाऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. पू. काकांचे म्हणणे असते, ‘‘आपण कुणाच्याही ऋणातून मुक्त होऊ शकत नाही; परंतु न्यूनतम आपण त्यांच्या ऋणांची जाणीव तरी ठेवायला पाहिजे.’’

‘मला अशा संतांच्या सत्संगात रहायला मिळाले’, याबद्दल मी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

– सौ. रिचा वर्मा (वय ५७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), संभाजीनगर (२७.१२.२०२१)