पुणे – अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवारांच्या विरोधात कविता पोस्ट केली, त्यात ‘तुका म्हणे’ असा उल्लेख केला आहे. ‘तुका म्हणे’ ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. ‘तुका म्हणे’ या शब्दांचा उल्लेख करून केतकी यांनी वादग्रस्त लेखन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संत तुकाराम महाराज संस्थान’ने केतकी यांच्यावर गुन्हा नोंद करायची मागणी केली आहे. यासाठी संस्थानच्या विश्वस्तांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे तक्रार अर्ज प्रविष्ट केला आहे. ‘भविष्यात अशी चूक कुणीच करू नये; म्हणून केतकी चितळे यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि कारवाई करावी’, अशी मागणी तक्रार अर्जात संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे पूजनीय श्रद्धास्थान आहेत. संत तुकाराम महाराज यांच्याच नव्हे, तर देशातील अन्य संतांच्या नावांचा वापर करून जर कुणी वादग्रस्त आणि विडंबनात्मक लिखाण करत असेल, तर त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ‘संत तुकाराम महाराज संस्थान’चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांची स्वाक्षरी आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? संतांचे विडंबन थांबवण्यासाठी विडंबन करणाऱ्यांना शिक्षा होणारा कायदा होणे आवश्यक आहे. |