मुंबई – आमच्यावरही अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट आणि चुकीची टीका केली गेली. तेव्हा आम्हीही तक्रार केल्या. त्या वेळी कुणाला अटक केली गेली नाही, म्हणजे आक्षेपार्ह पोस्ट विशिष्ट नेत्याविषयी असेल, तरच आरोपींना अटक करून विविध गुन्ह्यांत अडकवले जाते का ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अभिनेत्री केतकी चितळे यांच्या अटकेविषयी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्यावरून केतकी चितळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी मत व्यक्त करतांना तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘वेगवेगळी कलमे लावून केतकी चितळे हिला अडकवणे, ही कुठल्या पक्षाची परंपरा आहे ? कायदा सगळ्यांना समान आहे. सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय आहे का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. केतकी यांनी जाणीवपूर्वक शरद पवार यांच्या विरोधात लिहिले असेल, तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे; परंतु ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते केतकी हिला ‘ट्रोलिंग’ करत आहेत, तिची आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवत आहेत, शिवीगाळ करत आहेत, त्यावर कारवाई का होत नाही ? महाराष्ट्रात हा जो भेदभाव चाललेला आहे तो चुकीचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था शरद पवार यांचे समर्थकच बिघडवत आहेत. एखाद्या महिलेला लक्ष्य करणे चुकीचे आहे. केतकी हिला अटक केलीय, तर शरद पवार यांच्या समर्थकांवरही गुन्हे नोंदवा.’’