केतकी चितळे कणखर आहे आणि मला तिचा अभिमान आहे ! – सदाभाऊ खोत, अध्यक्ष, रयत क्रांती संघटना

सदाभाऊ खोत

धाराशिव – केतकी चितळे कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची आवश्यकता नाही. तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. आमचा लढा प्रस्थापितांच्या विरोधात आहे. जहागीरदारांनी गुन्हा केला, तर त्याला क्षमा करायची आणि इतरांनी केला, तर गुन्हा नोंद करायचा, हे योग्य नाही, असे परखड मत ‘रयत क्रांती संघटने’चे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतांना तुमची नैतिकता कुठे गेली होती ? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला लक्ष्य करतात, त्या वेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का ? स्वत:वर टीका केली की, सगळे आठवते, हे योग्य नाही.’’