(म्हणे) ‘जोराच्या वार्‍यामुळे पूल कोसळला !’

पूल कोसळण्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आय.ए.एस्. अधिकार्‍यांनी दिलेले उत्तर !

नवी देहली – बिहारमध्ये २९ एप्रिल या दिवशी बांधकाम चालू असलेला एक पूल कोसळल्याची घटना घडली होती. याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी माझ्या सचिवाला याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी मला, ‘जोराचा वारा सुटल्याने पूल कोसळला’, असे उत्तर दिले. भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात् आय.ए.एस्. अधिकार्‍याचे हे उत्तर ऐकून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. एक आय.ए.एस्.अधिकारी असे उत्तर कसे देऊ शकतो ? हवेमुळे पूल कसा कोसळू शकतो ? काहीतरी चूक झाली असणारच. १ सहस्र ७१० कोटी रुपयांचा खर्च करून उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करू शकत नसेल, तर हा चौकशीचा विषय आहे.

३ सहस्र ११६ मीटर लांब असलेल्या या पुलाचे काम वर्ष २०१४ मध्ये चालू झाले होते. वर्ष २०१९ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही त्याचे काम चालू आहे.

संपादकीय भूमिका

जनहिताच्या कामांना अशा प्रकारे विलंब करणार्‍यांना सरकारने कठोर शिक्षा केली पाहिजे आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला पाहिजे ! असे अधिकारी प्रशासनात असतील, तर देशाचा कारभार कसा चालू असेल, हे लक्षात  येते ! अशा अधिकार्‍यांना सरकारने घरीच बसवले पाहिजे !