(म्हणे) ‘शाळा आणि महाविद्यालये देणारा पक्ष पाहिजे कि दंगे घडवणारा ?’ – अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल

नागपूर – देशात होणाऱ्या वर्ष २०२४ च्या निवडणुकीत आमचे लक्ष्य नाही, तर आमचा देश एक क्रमांकाचा बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. आम्ही राजकारण करून सत्ता स्थापन करण्यासाठी नाही, तर देश घडवण्यासाठी आलो आहोत.

१० पक्षांच्या आघाडीसमवेत जायचे नसून १३० कोटी जनतेसमवेत आघाडी करायची आहे. एक पक्ष दंगे घडवणाऱ्यांना समवेत घेऊन सत्कार करतो. तुम्ही ठरवा, तुम्हाला शाळा आणि महाविद्यालये देणारा पक्ष पाहिजे कि दंगे घडवणारा ? अशी अप्रत्यक्षरित्या टीका देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केली आहे. ते येथे ८ मे या दिवशी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की,

१. अनेक पक्ष मी सोयीसुविधा विनामूल्य देत असल्याने माझ्यावर टीका करतात. खासगी चिकित्सालये किंवा शाळा संस्था यांच्यासमवेत माझे साटलोटे नाही. आम्ही लोकांना विनामूल्य देतो, तर यात चूक काय आहे ?

२. देशात दंगा झाल्यावर गुंडांना स्वत:च्या पक्षात घेऊन त्यांची शोभायात्रा काढली जाते. ज्यांना दंगे करणाऱ्या पक्षासमवेत जायचे आहे, त्यांनी जावे; पण ज्यांना शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य सुविधा पाहिजेत, त्यांनी माझ्यासमवेत यावे.

३. लोकांना विनामूल्य सोयीसुविधा देतांना पूर्ण भ्रष्टाचार बंद केला. त्यामुळे तो पैसा जनतेला सोयीसुविधा देण्यासाठी वाटप करत आहे. आज प्रतिवर्षी गरीब घरातील ४५० मुलांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळू लागला आहे.