डॉलरच्या रूपात भारतीय रुपयाने गाठला नीचांक !

महागाई वाढण्याचे संकेत !

नवी देहली – भारतीय चलनाने आतापर्यंतचा न्यूनतम आकडा गाठला आहे. ९ मे या दिवशी बाजारात अमेरिकी चलनाचे मूल्य वधारल्याने भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. एका डॉलरच्या तुलनेत ७७.४२ रुपयांपर्यंत भारतीय रुपया खाली घसरला होता.

विदेशी चलनाची गंगाजळीही पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलरच्या खाली आली आहे. गेल्या ८ आठवड्यांपासून गंगाजळी सातत्याने न्यून होत आहे. २९ एप्रिल या दिवशी संपलेल्या आठवड्यामध्ये ही गंगाजळी ५९७.७३ अब्ज डॉलर (४६ लाख २८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) राहिली होती.

असा पडणार सर्वसाधारण भारतियावर प्रभाव !

रुपयाच्या अवमूल्यनाचा सर्वाधिक परिणाम हा आयात करण्यात येणार्‍या वस्तूंच्या मूल्यावर पडणार आहे. कच्च्या तेलाविषयी सांगायचे, तर भारत ८० टक्के तेल आयात करतो. त्यामुळे तेल खरेदी करण्यासाठी विदेशी चलनाची गंगाजळी अधिक प्रमाणात खर्च होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेल यांसारखी इंधने महाग होत आहेत. यासमवेतच इलेक्ट्रॉनिक साहित्यापासून अलंकारही महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.