प्रत्येकाने मूल्याधिष्ठित जीवनपद्धत अंगीकारणे आवश्यक ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री

पुणे – भारतीय संस्कृती ही भगवान महावीर, गौतम बुद्ध, तसेच भगवद्गीता यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. या संस्कृतीत जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. जगातील आजची स्थिती तणावपूर्ण आहे. आजच्या काळात मूल्याधिष्ठित जीवनपद्धत आचरणात आणणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते पुणे येथे झालेल्या ‘जीतो कनेक्ट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी ‘जीतो पुणे’चे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश रांका आणि अन्य संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले की, देशाच्या निर्माणासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. जगाची काळजी करताना आपण देशाचीही तेवढीच काळजी करायला हवी. भारताला आत्मनिर्भर बनायचे असेल, तर स्वदेशीचा वापर प्रत्यक्षात आणला गेला पाहिजे.