अमित शहा यांच्या दौर्‍यापूर्वी कोलकातामध्ये भाजप कार्यकर्त्याचा फासावर लटकवल्याच्या अवस्थेत सापडला मृतदेह !

डावीकडून भाजपच्या युवा जिल्हा मोर्च्याचे उपाध्यक्ष अर्जुन चौरासिया(वर्तुळात) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

कोलकाता (बंगाल) – येथे भाजपच्या युवा जिल्हा मोर्च्याचे उपाध्यक्ष अर्जुन चौरासिया यांचा मृतदेह फाशी दिल्याच्या स्थितीत आढळून आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २ दिवसांच्या बंगालच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या युवा जिल्हा मोर्च्याच्या उपाध्यक्षाचा असा मृतदेह आढळून येणे, हा घातपात असल्याचे बोलले जात आहे. शहा यांच्या भेटीच्या प्रीत्यर्थ शहरात दुचाकी गाड्यांची रॅली काढण्यात येणार होती. त्याचे दायित्व चौरासिया यांच्यावर सोपवण्यात आले होते.

भाजपने ‘चौरासिया यांची हत्या करण्यात आली असून त्याला तृणमूल काँग्रेस उत्तरदायी आहे’, असा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देतांना तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन म्हणाले, ‘‘आमच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत.’’ पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. कार्यकर्त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर अमित शहा यांच्या स्वागताचा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे. अमित शहा अर्जुन याच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एवढेच कशाला भाजपच्या अनेक नेत्यांवर यापूर्वीही जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. ही रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने धोरणात्मक पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
  • तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे हे द्योतक आहे. हे लक्षात घेऊन बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या !