देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा !

हिंदु जनजागृती समितीची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

सोलापूर, ५ मे (वार्ता.) – कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतात व्यापारासाठी आलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळापासून ते आतापर्यंत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांचे लक्ष्य विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणे हाच उद्देश दिसून येतो. सद्यःस्थितीत देशात प्रतिवर्षी १० लाख हिंदूंचे धर्मांतर होते, ही खेदाची गोष्ट आहे. एकीकडे देशभरात धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटत हिंदूंना त्यांच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित करायचे आणि दुसरीकडे कॉन्व्हेंट शिक्षण संस्थांमध्ये हिंदु मुलांना बायबल बंधनकारक करायचे, हा दुटप्पीपणा असून हिंदु विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. सोलापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. श्रीरामकृष्ण तवटम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पिसे, विनोद रसाळ, रमेश आवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. ‘कॉन्व्हेंट शाळां’मधून नेमके काय शिकवले जाते, हे पहायला हवे. त्यांच्या आर्थिक स्रोतांची केंद्र सरकारने चौकशी करावी. ‘कॉन्व्हेंट शाळां’ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी चांगल्या सुविधा असलेल्या सरकारी शाळांची निर्मिती करावी, म्हणजे बहुसंख्य हिंदु विद्यार्थी तेथे शिक्षण घेऊ शकतील.

२.  लहान आणि अल्पवयीन मुलांना बायबल शिकण्याची अन् ख्रिस्ती पंथांनुसार आचरण करण्याची सक्ती करणे, हा एकप्रकारे धार्मिक अत्याचार असून ‘बाल हक्क संरक्षण कायदा २००५’नुसार तो गुन्हा आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु पालकांनो, कॉन्व्हेंट शाळांचे ख्रिस्तीधार्जिणे स्वरूप पहाता पाल्यांसाठी तेथे प्रवेश घ्यायचा कि नाही, ते ठरवा !